माथेरानचा १६४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

matheran2
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेल्या माथेरान या सुंदर हिलस्टेशनचा १६४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथे २१ मे ते २६ मे दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसामिमित्त येथील युवकांनी ५ किलोचा केकही कापला. कवी अरूण म्हात्रे यांच्या हस्ते हा केक कापला गेला आणि त्याचवेळी माथेरानवरचे गीतही सादर केले गेले.ढोल ताशे, घोड्यावरून मिरवणुका यावेळी काढण्यात आल्या.

एखाद्या पर्यटनस्थळाचा वाढदिवस साजरा केला जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. पर्यावरण संवेदनशील, नितांत सुंदर आणि हेरिटेज व्हॅल्यू असलेल्या या पर्यटनस्थळाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित महोत्सवातही मोठ्या संख्येने पर्यटक सामील झाले आहेत. स्थानिकांच्या मते मात्र निसर्ग जे देतो, त्याचे ऋण कधीच फेडता येत नाही. मात्र कृतज्ञता व्यकत करण्यासाठी येथील पर्यावरणाचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे.

मुंबईपासून ९० किमीवर असलेल्या माथेरानला १९५० साली ब्रिटीशांनी तसेच ठाणे कलेक्टरनी हिल स्टेशनचा दर्जा दिला. येथे वाहने नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे नीरव शांततेचा अनुभव येथे घेता येतो. दाट जंगल, खोल दर्‍या, उंच कडे असलेल्या या स्थळी एकाच प्रकारची झाडे आढळतात व म्हणून या स्थळाला वन ट्री हिल असेही संबोधले जाते. ट्रेकर्ससाठीही हे स्थळ अतिशय आवडते आहे. नेरळ येथून जाणारी छोटीशी झुकझुक गाडी पर्यटकांना अनोखा अनुभव देतेच पण हौस असेल तर डोंगर चढून जाऊनही माथेरानला जाता येते.

Leave a Comment