पुण्याच्या भाजपमध्ये पुन्हा गटबाजीचा भडका

bjp
पुणे : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या भाजपमध्ये आता पुन्हा एक -दीड वर्षानंतर गटा -तटाचे ‘टेबल’ मांडले गेले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक तशी गटबाजीविरहित झाली असली तरी स्थानिक नेते आणि राज्यच काय देशपातळीवरील नेत्यांच्या समर्थकांचे गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, कारण काय तर नवनिर्वाचित खासदार अनिल शिरोळे यांच्या विजयी मिरवणुकीवरून वाद झाला आहे. त्यातून महिला आघाडीच दुखावली गेली आहे.पण प्रकरण काय घडले याचीच माहिती खासदारांना नसल्याने आणि ज्यांचा वाद झाला ,त्या नगरसेविका उपस्थित नसल्याने समजुतीचे नाट्य रंगले आणि प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

पुण्यातील भाजपच्या विजयी यात्रेत दोन गटातील वाद उफाळून आल्याने पुन्हा ‘मागचे पाढे …’याधर्तीवर शहर भाजपमधील वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी ,खासदार शिरोळेंचा विजय साजरा करण्यासाठी विजयी यात्रा काढण्यात आली;पण ही विजयी यात्रा कोणत्या भागातून न्यावी यावरून महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि नगरसेविका मेधा कुलकर्णी आणि माजी नगरसेवक मुरली मोहोळ यांच्यात वाद झाला. मुरलीधर मोहोळ हे अनिल शिरोळे यांचे कट्टर समर्थक आहेत. ही विजयी यात्रा सुरु असताना या दोघांनी अनिल शिरोळेंच्या समोरच वाद घातला. या वादातच मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं आणि त्या रागाने विजयी यात्रेतून निघूनही गेल्या. मेधा कुलकर्णी यांच्याबाबत घडलेल्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीकडून नवनिर्वाचित खासदार आणि शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा विचार सुरु झाला ते कळताच भाजपच्या नेत्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलविले आणि प्रकरण शांत करण्यात यश मिळविले.

Leave a Comment