मुंबई – लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेने राजकीय उलथा-पालथ झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत , त्याला राष्ट्रवादीही अपवाद नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ‘झाडाझडती’ घेताना आता नव्या चेहऱ्यांना संधी देवून ‘भाकरी’ फिरविण्याचे संकेत दिले आहेत.
पवारांची ‘झाडाझडती’ ,आता ‘भाकरी’ फिरवणार
राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत पवार यांनी पुन्हा लोकांपर्यंत पोहचा ,जिल्ह्या- जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या ,अशा सूचना करताना मात्र पक्षात भपकेबाजपणा वाढत असल्याकडेही लक्ष वेधले. पवार म्हणाले ,भपकेबाजपणा सोडा आणि साधेपणाने थेट जनतेमध्ये मिसळा. लोकसभेत जे घडले ,ते विधानसभा निवडणुकीत घडेल असे काही नाही, आपल्याला तशी काळजी नाही पण आपण जनतेत पोहचलो पाहिजे. आता स्वतः १४-१५ तास पक्षासाठी वेळ देणार असल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले ,आता पुरे झाले आहे, येत्या विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे पद काढून नव्याने रचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.भपकेबाजपणा सोडला नाही तर काही खरे नाही अशा शब्दातही त्यांनी पदाधिकार्यांना खडसावले.