‘तुमचे किती-आमचे किती’,युतीत रंगणार ‘महाभारत ‘!

मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात सत्तांतर झाले,आता आगामी विधानसभा निवडणुका भाजप आणि मित्र पक्षांना महत्वपूर्ण ठरणार आहेत.मात्र लोकसभेतील घवघवीत यशामुळे भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यात महाराष्ट्रात शिवसेनाच युतीत मोठा भाऊ हे उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केल्याने आता युतीत जागावाटपावरून ‘तुमचे किती- आमचे किती’ असा ‘महाभारत ‘ रंगणार याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाचे १७१ – ११७ हे जुने सूत्रच कायम राहील आणि मुख्यमंत्री आमचाच असेल, असे जाहीर करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला आता भाजपच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यांना जागावाटपाचा हा जुना फॉर्म्युला बिलकूल मान्य नाही. त्यात राज्यात भाजपची ताकद वाढल्याचे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट दिसत असल्याने आता विधानसभेला जागा जास्त पाहिजे ,हा मुद्दा आतापासूनच रेटण्यात येत आहे. आम्हाला जागा वाढवून मिळाल्याच पाहिजेत, असा सूर प्रदेश भाजपच्या गोटात आळवला जात आहे. तसेच ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री’, या सूत्राचीही आठवण करून देण्यास प्रारंभ झाला आहे. त्यात महायुतीत सहभागी असलेल्या रिपाईची भूमिका अद्याप ‘आखाड्या’त आलेली नाही. त्यांच्या भूमिकेनुसार आणि भाजपच्या पवित्र्यानुसार महायुतीत ‘महाभारत’ कधीही घडू शकते असेही बोलले जात आहे. लोकसभेच्या निकालानुसार राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी २४० मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली आहे. त्यात भाजपची ताकद अधिक वाढली आहे ,ही बाब जगजाहीर झाली आहे. त्यातूनच भाजप शिवसेनेकडे १५० जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ जागा यंदा जादा घ्यायच्या असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे युतीत ‘बिघाडी’ होते का ? आणि त्याचा लाभ आघाडीला मिळतो का? या मुद्दयांना महत्व आले आहे.