मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाघ दत्तक घेतला आहे. शिवसेनेचे वाघ हे प्रतीक आहेच तसेच लोकसभेत सेनेने अभूतपूर्व यशही मिळविले आहे. विशेष म्हणजे या दत्तक वाघाचे नांवही यश असे आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या दोन गुहांवर आता ठाकरे कुटुंबाचे नांव लिहिले जाणार आहे. आदित्य यांचे भाऊ तेजस यांनी याच उद्यानातून दोन मांजरे दत्तक घेतली आहेत.
आदित्य ठाकरे यांनी दत्तक घेतला वाघ
वनाधिकार्यानी दिलेल्या माहितीनुसार हे प्राणी दत्तक घेण्यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. वाघासाठी ठाकरे यांनी १ वर्षासाठीचे दत्तक शुल्क ३ लाख रूपये भरले आहे. नियमानुसार आदित्य आठवड्यातून एकदा आपल्या दत्तक वाघाची भेट घेऊ शकणार आहेत. गेल्या वर्षीच त्यांना वाघ दत्तक घ्यायचा होता मात्र त्यावेळी कायदेशीर पूर्तता वेळेत न झाल्याने ते जमले नव्हते असेही समजते.
युवासेना नेते आदित्य हे स्टायलिश ठाकरे म्हणून ओळखले जातात.१७ आक्टोबर २०१० रोजी स्थापना झालेल्या युवासेनेच्या राज्यासह राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, बिहार, जम्मू येथेशाखा असून लवकरच देशभरात या सेनेच्या शाखा उघडण्यात येणार आहेत.