आत्मपरीक्षणाची लाट सोनिअ

sonia
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर का होईना पण कॉंग्रेसमध्ये पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची लाट आली आहे. अनेक नेते आपल्या परीने आणि आपल्या कुवतीनुसार पराभवाचे विश्‍लेषण मांडत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यान झालेल्या चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर हाच आत्म परीक्षणाचा प्रयास केला असता तर बरे झाले असते. निदान त्या निवडणुकीतल्या चुकांचा विचार करून लोकसभा निवडणुकीची तयारी केली असती आणि आता झालाय तेवढा दारुण पराभव झाला नसता. अर्थात कॉंग्रेसमधले विश्‍लेषण हे नेहमीच मुद्याला सोडून असते. नेतृत्वाला हात घालण्याचा विचार कोणीच मांडत नाही. उत्तर प्रदेश विधानसभेत राहुल गांधी नेते आणि दिग्विजयसिंग हे सल्लागार होते. त्यांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावे लागले. असा पराभव होऊनही याच दुकलीने चार राज्यात निवडणूक मोहिमेेचे नेतृत्व केले. तिथेही पराभव झाला. कॉंग्रेस काय की भाजपा काय निवडणुका जिंकताना सत्ताधारी पक्ष काही ुचुका करतोय का याचाच विचार करत असतात. स्वत:च्या बाजूने सकारात्मक काही करीत नाहीत. आताही कॉंग्रेसमध्ये आत्मपरीक्षण वगैरे काही होत असले तरीही त्यातल्या अनेकांना मोदी काही तरी चुका करतील आणि त्यातून अस्थिरता निर्माण होऊन आपल्याला नक्कीच संधी मिळेल असा विचार करीत आहेत.

कॉंग्रेस पक्ष आत्मपरीक्षण करून काहीही उपाय योजणार नाही. याच सोनिया गांधी आणि हेच राहुल गांधी नंतर विजय मिळवून देतील असे त्यांना वाटते. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष काही विचार करून आपल्यात काही बदल करेल अशी संभावना नाही. कॉंग्रेसमध्ये सुरू असलेले आत्मपरीक्षण ज्या पद्धतीने सुरू आहे ते याच रितीने सुरू राहणार आहे आणि त्यातून कॉंग्रेसचे खरेखुरे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता फार कमी आहे. हे आत्मपरीक्षण म्हणजे आत्मवंचना होत आहे. राष्ट्रवादीचेही आत्मपरीक्षण याच मार्गाने सुरू आहे. काल राष्ट्रवादीच्या या निमित्ताने झालेल्या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की, कॉंगे्रसचे नेते फार इंग्रजीत बोलत होते म्हणून पराभव झाला. या म्हणण्यात तथ्य आहे. कारण पी. चिदंबरम, मनमोहनसिंग, ए. के. अँथनी, सोनिया गांधी या बिनीच्या नेत्यांना हिंदी येतच नाही. ज्यांना हिंदी येते त्यांच्या भाषणात हिंदीपेक्षा इंग्रजी शब्द जास्त असतात. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना टॉफी मॉडेल, एमएसपी असल्या शब्दांचाच वापर जास्त होत होता.

हे लोक जनतेच्या काळजाला हात घालू शकत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद साधू शकत नाहीत. सोनिया गांधी यांना रोमन लिपीत हिंदी भाषण लिहून द्यावे लागते तर मनमोहनसिंग यांना उर्दु लिपीत हिंदी भाषण लिहून द्यावे लागते. राहुल गांधी यांना हिंदी भाषा आणि लिपी दोन्हीही कळते पण काय बोलायचे हे कळत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मराठी येते पण मराठी शिवाय काहीच येत नाही आणि मराठी येत असले तरी मराठीत ‘काय बोलू नये’ हे कळत नाही. पराभवाचे कारण शोधताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेसच्या इंगजीचे कारण शोधून काढले पण आपल्या नेत्यांनी बोेलून घाण केलेली त्यांना दिसली नाही. शरद पवार यांनी तर शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला. त्यांनी भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असे प्रचाराच्या काळातच सांगून टाकले. अजित पवार तर कमाल करतात. जेवढे अचकट विचकट बोलू तेवढे लोक चेकाळतात आणि अजित पवार खुष होतात. कॉंग्रेसच्या नेत्यांनीही पराभवाची अनेक कारणे दाखवायला सुरूवात केली आहेत. पक्षाचा पराभव झाला की, कारणे शोधली पाहिजेत. पण ती शोधताना एकतर परखडपणा हवा आणि परखडपणाने शोधलेल्या कारणांनंतर त्यात सुधारणा करणारी कृतीही व्हायला हवी. कॉंग्रेस मध्ये पराभव झाल्यानंतर शिक्षा देण्याऐवजी बक्षिस देण्याची पद्धत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत शीला दीक्षित यांचा एवढा मोठा पराभव झाला. या निकालानंतर त्या वनवासात जायला हव्या होत्या पण त्याऐवजी त्यांना राज्यपालपदाचे बक्षिस देण्यात आले. मिलींद देवरा यांनी सल्लागारांना लक्ष्य केले. त्यांच्या या शोधाने त्यांचे नाव छापून आले या पलीकडे काहीही होणार नाही. आत्मपरीक्षणाच्या कोणत्याही विश्‍लेषणाच्या शेवटी कारवाई झाली पाहिजे. मिलींद देवरा ज्या सल्लागारांवर तोफा डागत आहेत त्यांना आता या सल्लागार पदांवरून हाकलावे लागणार आहे. पण देवरा तर त्यातल्या कोणाचेही नाव घेत नाहीत. ते नावच घेत नसतील आणि ठोस आरोप करणार नसतील तर कारवाई कशी होणार आहे. कोण आहेत हे सल्लागार ? जयराम रमेश, दिग्विजयसिंग, अहंमद पटेल, कपिल सिब्बल की आणखी कोणी? अशी नावे समोर आली तरच त्यांना शिक्षा देता येईल. पण तसे काही होणार नाही. होणार एवढेच आहे की सल्लागार म्हणून मिलींद देवरा यांची वर्णी लागणार आहे. बस्स एवढेच. कारण त्यांनी कोणाचेही नाव न घेता, राहुल गांधी हे पराभवाला जबाबदार नाहीत हे मत प्रस्थापित करण्याचे काम केले आहे.

Leave a Comment