पहिली उडती तबकडी- नासा घेणार चाचणी

nasa
अमेरिकेची अवकाश संस्था नासाने तबकडीच्या आकाराच्या पहिल्यावहिल्या सुपरसॉनिक वाहनाची चाचणी घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही चाचणी ३ जूनला यूएस नेव्ही पॅसिफिक मिसाईल रेंज फॅसिलिटी केंद्रातून घेतली जाणार आहे. या तबकड्यांच्या आकाराच्या यानांचा उपयोग मंगळाच्या पृष्ठभागाची अधिक निरीक्षणे करण्यासाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे या यानातून अंतराळवीरही प्रवास करू शकणार आहेत.

नासाने या लो डेन्सिटी सुपरसॉनिक डिस्लेरेटर ची बांधणी पूर्ण केली असून हे यान हवाई बेटातील केंद्रावरून एका प्रचंड मोठ्या बलूनच्या सहाय्याने १लाख २० हजार फुटांपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे बूस्टर रॉकेट हे यान पुढे १ लाख ८० हजार फुटांपर्यंत नेणार आहे. याचा वेग आवाजाच्या वेगाच्या साडेतीन पट असून नंतर हे यान समुद्रात पॅराशूटच्या सहाय्याने उतरविले जाणार आहे. या यानाच्या आणखी दोन चाचण्या २०१५ मध्ये घेण्यात येणार आहेत.

भविष्यातील मंगळ मोहिमा मानवालाही करता याव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे तबकडीवजा यान खूपच उपयुक्त ठरेल असा विश्वास नासातील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.