मुंबई – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करलेल्या कॉंग्रेसमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत गटा तटाच्या राजकारणात उमेदवाराला फटका कसा बसला? कोण कमी पडले ,नियोजन कसे चुकले याचा अहवाल हायकमांडने मागविला आहे,त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये लवकरच बदलाचे वारे वाहणार असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे.
कॉंग्रेसमध्ये आता ‘बदलाचे वारे’ ?
लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे सध्या काँग्रेसपक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी विधानसभा लक्षात घेता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रभारी मोहन प्रकाश यांना हटविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात एकवटलेल्यानी जोरदार प्रयत्न चालविले असले तरी त्यात त्यांना यश लाभणार नसल्याचा दावा सूत्र करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार नवा मुख्यमंत्री आणणे सहजशक्य नाही. तसेच त्यातही स्पर्धा रंगली तर पक्षालाच त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. याकडेही लक्ष वेधले जात आहे.
माणिकराव ठाकरे आणि मोहन प्रकाश यांच्या कार्यशैलीवर राहूल गांधी नाराज असल्याचीही चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनींच मुख्यमत्र्यांना टार्गेट केले आहे. मात्र, अद्याप पक्षाने याबाबत आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.त्यामुळे हायकमांड कोणते बदल करते याकडे कॉंग्रेसच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे,त्यात पुण्यात माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या समर्थकांना पदावरून हटविण्याबाबत लवकरच निर्णय होणार असून पराभूत उमेदवार विश्वजित कदम यांच्याकडे पुणे शहर कॉंग्रेसचे महत्वाचे पद सोपविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.