महाराष्ट्र विधानसभा स्वबळावर लढविण्यासाठी भाजपची चाचपणी

मुंबई – आक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याचा विचार भाजपत सुरू असून त्यादृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेते चाचपणी करत आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यात पक्षाने मिळविलेले यश आणि मोदी सरकारला तोपर्यंत केंद्रात सत्तेवर येऊन पुरे होत असलेले १०० दिवस या दोन्ही बाबी महाराष्ट्रातील निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठीचा आत्मविश्वास पक्षाला पुरवित आहेत असेही सांगितले जात आहे. मोदी लाटेचा असर ओसरण्याआधीच निवडणुका होत असल्याने विधानसभा स्वबळावर लढविण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांत भाजप नंबर १ चा पक्ष ठरला आहे. त्यांनी २३ जागा जिकल्या आहेत. राज्यात महायुती स्थापन झालेली आहे. शिवसेना विधानसभेसाठीच्या जागांवर तडजोडीस तयार नसल्याचे संकेत दिले जात असताना रिपब्लीकनसह अन्य चारी पक्षांनाही जागा सोडणे भाग पडणार आहे. मनसेला लोकसभेत अपयश आले असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना कमी लेखून चालणार नाही. ही परिस्थिती पाहता भाजपने स्वबळावरच या निवडणुका लढवाव्यात असा विचार पुढे आला असून राज्यातील नेते त्यासाठी आग्रही आहेत.

सध्या विधानसभेत भाजपचे ४६ तर सेनेचे ४५ आमदार आहेत आणि त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद भाजपकडे आहे.

Leave a Comment