भाजपा नेत्यांच्या महत्वाकांक्षा

bjpback
महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांना शिवसेनेची साथ सोडून स्वबळावर विधानसभा निवडणुका लढविण्याची दुर्बुद्धी सुचायला लागली आहे. या लोेकांना लोकसभेच्या निवडणुकीत २३ जागा मिळाल्याची मस्ती चढली आहे आणि तिच्यापोटी ते शिवसेनेला सोडून देण्याच्या कल्पना रचायला लागले आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीतली हवा विधानसभेपर्यंत टिकेल अशी अवाजवी आशा तर वाटत आहेच, पण त्यांना केंद्रातल्या राजकारणाची जाणीव नाही. केंद्रात भाजपाने २८३ जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन करण्याची क्षमता सिद्ध केली असली तरी या २८३ जागा अन्य पक्षांशी युती केल्यामुळेच मिळाल्या आहेत हे त्यांना लक्षात येत नाही. नरेंद्र मोदी यांच्या ते नीट लक्षात आहे. पण महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांना वस्तुस्थितीची जाणीव नाही. त्यांनी आम आदमी पार्टीपासून काही तरी शिकले पाहिजे. दिल्ली विधानसभेच्या डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला ७० पैकी २८ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाचे पूर्ण पानिपत झाले.

विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पार्टीला लोकसभेच्या किमान तीन जागा मिळायला हव्या होत्या, पण एकही जागा मिळाली नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या पोरकट राजकारणाचा हा परिणाम आहे, ही गोष्ट निश्‍चित आहे. मात्र तिच्यापासून मर्यादित अर्थाने का होईना एक धडा घेतला पाहिजे. एखाद्या राज्यात विधानसभा किंवा लोकसभा यांच्या निवडणुका चार-पाच महिन्याच्या अंतराने झाल्या की, दोन्हींचे निकाल सारखे नसतात. याची अनेक उदाहरणे देता येतील. एकदा लाट येते पण ती कधी कधी येते त्या वेगाने ओसरत सुद्धा असते. नंतरच्या निवडणुकीत लाटेचा मागमूस सुद्धा दिसत नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला २३ जागा मिळाल्या आहेत आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. या निकालाचे विधानसभा मतदारसंघनिहाय विश्‍लेषण केले असता भाजपाच्या उमेदवारांना सुमारे १४० विधानसभा मतदारसंघात मताधिक्य प्राप्त झालेले आहे. त्याच अर्थ भाजपाच्या नेत्यांनी असा काढला आहे की, आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपाचे आमदार १३० ठिकाणी निवडून येतील. असे जर आहे तर भाजपाने स्वबळावरच विधानसभेची निवडणूक का लढवू नये? शिवसेनेची कुबडी हवीच कशाला? एकंदरीत भाजपाच्या नेत्यांना स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ही कल्पना फेटाळून लावली आहे आणि भाजपाचा असा काही विचार सुरू नाही असे स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाच्या काही नेत्यांच्या मनामध्ये हा विचार आलेला असणार हे नक्की. मात्र त्यांनी या कल्पनेच्या अनुरोधाने खालील मुद्दे विचारात घेण्याची गरज आहे.

पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेले मतदान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मिळालेले आहे. महाराष्ट्रातल्या भाजपाच्या आणि शिवसेेनेच्या कित्येक मतदारसंघांमध्ये असा अनुभव आला आहे की, हजारो मतदारांनी उमेदवार कोण आहे याची माहिती नसून सुद्धा मोदीसाठी म्हणून कमळाचे आणि धनुष्यबाणाचे बटन दाबलेले आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत १३० जागा मिळण्याचा या भाजपा नेत्यांचा अंदाज सपशेल चुकीचा आहे. अर्थात अशी नकारात्मक भाषा वापरतानाच मोदींची लाट काही प्रमाणात का होईना टिकण्याची शक्यता एकदमच नाकारता येत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या २३ खासदारांमागे या पक्षाला १२० पर्यंत जागा मिळू शकतील. अर्थात ही अतिशयोक्ती आहे, पण ती खरी धरली तरी १२० जागांच्या बळावर राज्यात सरकार स्थापन करता येत नाही. कोणाशी तरी तडजोड करावीच लागणार आहे. तशी ती करावी लागणार असेल तर शिवसेनेशी वाकडे घेऊन भाजपाचे नेते काय मिळविणार आहेत?

मुळात लक्षात ठेवण्याची एक गोष्ट अशी आहे की, शिवसेना आणि भाजपा यांच्या २५ वर्षांपासूनच्या जागा वाटपात भाजपाला लोकसभेच्या जास्त जागा द्याव्यात आणि शिवसेनेला विधानसभेच्या जास्त जागा द्याव्यात असे ठरलेले आहे. म्हणून भाजपाने २८ जागा लढवल्या आणि शिवसेनेने २० जागा लढवल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना तर ते नेहमीच भाजपाला लोकसभेच्या जास्त जागा द्यायला तयार असत. एकदा तर त्यांनी मनमोकळेपणाने लोकसभेच्या सगळ्याच जागा भाजपाने लढवाव्यात अशी ऑफर दिली होती. जागा वाटपाच्या या सूत्रानुसार लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणार हे उघड आहे. तेव्हा २३ जागा मिळाल्या म्हणून भाजपाच्या या नेत्यांनी फार हुरळून जाण्याची काही गरज नाही. शिवाय भाजपाच्या या २३ जागा मिळविण्यास शिवसेना आणि महायुतीतल्या अन्य पक्षांचाही पाठींबा कारणीभूत ठरलेला आहे. भाजपाने या लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवल्या असत्या तर त्यांना २३ जागा मिळाल्या नसत्या. तेव्हा निवडणुकीच्या निकालाच्या आकड्यातील गंमत आणि पक्षाच्या मर्यादा याचे भान ठेवून भाजपा नेत्यांनी स्वप्ने पाहिली पाहिजेत. अवाजवी स्वप्ने पहायला नकोत.

Leave a Comment