नारायण राणेंसाठी ‘बाबा’ हटाव !

मुंबई – मोदी लाटेत देशभर कॉंग्रेस उध्वस्त झाली,महाराष्ट्रात तर दिग्गज पराभूत झाले शिवाय कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली. परिणामी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना माजी मुख्यमंत्री यांनी जो समर्थ त्यालाच यश लाभते ,असे वक्तव्य केले नाही तोच कोकणात सेनेकडून चारीमुंड्या चित झालेले नारायण राणे यांना मुख्यमंत्री करा असा पवित्रा राणेंच्या समर्थकांनी घेतला आहे, त्यामुळे कॉंग्रेसमध्ये आता शह -काटशहाचे राजकारण पेटल्याचे अधोरेखित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे . लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणचा गड पुन्हा खेचून घेतला. नीलेश राणे यांचा सेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला. जन्मभूमीतील हा पराभव जिव्हारी लागल्याने नारायण राणे यांनी निकालादिवशीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या समर्थकांनी मात्र राणे यांनीच कोकणचे आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी आग्रही मागणी करताना सिंधुदुर्ग कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठरावही मंजूर केला आहे. या ठरावाची प्रत २२ मे रोजी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेऊन दिली जाणार आहे.

Leave a Comment