छान सुरूवात

modi
काल दुपारी भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी याची भारतीय जनता पार्टी सांसदीय पक्षाचे नेते म्हणून एक मताने निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या आपल्या २१ मित्रपक्षांची बैठक घेतली. त्यातली त्यांची आघाडीचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. नंतर सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना या निवडीचे कल्पना दिली. त्यावर राष्ट्रपतींनी त्यांची पंतप्रधान म्हणून निवड करून येत्या २६ तारखेला त्यांचा शपथविधी होईल अशी घोषणा केली. गेल्या ८ महिन्यांपासून सारा देश ढवळून काढणार्‍या निवडणूक प्रचार मोहिमेची समाप्तीच एकप्रकारे अशी सुखद रितीने झाली. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातला एक आगळा वेगळा क्षण काल दुपारी १२ वाजता नोंदला गेला. भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात लिहिले जावे यासाठी त्यांची भारतीय जनता पार्टीच्या सांसदीय पक्षाचे नेते म्हणून काल एकमताने निवड करण्यात आली. हा प्रसंग अनेक अर्थाने ऐतिहासिक, प्रेरक आणि अविस्मरणीय आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिले पूर्ण स्पष्ट बहुमतातले कॉंग्रेस विरोधी सरकार सत्तेवर येत आहे. अ

ाजवर विरोधी पक्षाची सरकारे सत्तेवर आली पण ती आघाड्यांची सरकारे होती. भारताची जनता अशा आघाड्यांच्या सरकारांना आणि त्यातल्या मुख्य पक्षातर्फे केल्या जाणार्‍या तडजोडींना वैतागलेली आहे. एखाद्या राज्यात आघाडी सरकार असेल आणि ते अनेक प्रकारच्या तडजोडी करत ते कसबसे चाललेले असेल तर एक वेळ ठीक समजता येईल पण देशाचा कारभार करणारे सरकार अस्थिर आणि मुख्य पक्षाला सतत तडजोडी करीत चाललेले असेल तर देशाच्या भवितव्यावर कधी कधी विपरित परिणाम होत आणि त्याला वैतागलेल्या भारती मतदारांनी यावेळी तरीय जनता पार्टीला स्पष्ट कौल देऊन केंद्रात भक्कम आणि स्पष्ट बहुमतातले सरकार स्थापन करण्याचा आदेश दिला. हे केवळ कॉंग्रेस विरोधी पक्षाचेच नव्हे तर गेल्या ३० वर्षातले एकूणच स्पष्ट बहुमतातले सरकार आहे. या पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यासाठी ज्या सेंट्रल हॉलमध्ये ज्या खासदारांची बैठक झाली त्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी कधी पाऊलसुध्दा टाकलेले नाही. किंबहुना ते कधीच खासदार झालेले नसल्यामुळे त्यांनी हे सभागृह कधी पाहिलेलेसुध्दा नाही. तेव्हा अशा नेत्याची पदावर निवड होणे हा सुध्दा एक ऐतिहासिक क्षणच आहे. श्री. नरेंद्र मोदी हे अतीशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांचा कसला धंदा, व्यवसाय नाही. त्यांच्या वडिलांनी रेल्वे स्थानकावरचे कँटीन चालवून तिथे चहा विकून कुटुंबाची गुजराण केलेली आहे.

भारताच्या राजकारणामध्ये कोणत्याही पदावर निवडून येण्यासाठी घटनेने कसलीही अट घातलेली नाही. सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला कोणीही नेता किंवा कार्यकर्ता देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत वाटचाल करू शकतो. अर्थात, ही मुभा घटनेच्या कलमातच बंद झालेली आहे. प्रत्यक्षात सामान्य कुटुंबातली व्यक्ती साधा आमदारसुध्दा होऊ शकत नाही. कारण त्यासाठी करावा लागणारा संघर्ष गरीब माणसाच्या आवाक्यातल्या नसतो. मात्र नरेंद्र मोदी यांनी वेगळ्या परिस्थितीतून वाट काढत स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर पंतप्रधानपद प्राप्त केले आहे. ही काही सामान्य वाटचाल नाही. हे एका सामान्य कुटुंबातल्या तरुणाचे असामान्य यश आहे. वेळ पडल्यास आणि क्षमता असल्यास अशा कुटुंबातली व्यक्तीसुध्दा हे सर्वोच्च पद प्राप्त करू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्या लोकशाहीचा, घटनेने दिलेल्या अधिकाराचा आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याचा हा फार मोठा विजय आहे.

या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांची निवड ज्या पध्दतीने आणि संसदेच्या प्रतिष्ठेला साजेल अशा गांभिर्याने झाली त्या पध्दतीचासुध्दा परिणाम या निवडीचे दृश्य बघणार्‍या करोडो लोकांच्या मनावर झालेला आहे. कारण गेल्या ७-८ महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करताना जी पक्षीय पातळी गाठली होती तिच्या पलीकडे जाऊन या सभेत भाषण केले. इथे त्यांच्या भाषणात आपल्या विरोधकांवर टीका करण्याचा सवंगपणा त्यांनी कटाक्षाने टाळला. आपण उमेदवार भाजपाचे असलो तरी नेते रालो आघाडीचे आहोत आणि पंतप्रधान १२५ कोटी लोकांचे आहोत हे त्यांचे म्हणणे त्यांनी यावेळी भाषण करताना पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांच्या निवडीच्या या क्षणाची उंची त्यांच्या या धीर गंभीर आणि परिपक्व भूमिकेमुळे चांगलीच वाढली हे नाकारता येणार नाही. पंतप्रधानांनी याच दर्जाने वागले पाहिजे असे भारतीयांना वाटते. लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून हीच अपेक्षा केली होती आणि त्यांनीही लोकांची निराशा केली नाही. त्यांनी या सभागृहात प्रवेश करताना सभागृहाच्या पायर्‍यांवर डोके टेकवले. हा भावूकपणा असला तरी तो त्यांच्या गांभिर्यालाही शोभून दिसला. भारतीय जनता पार्टीचे नेते सत्तेवर आल्यास भारताची घटना बदलतील असा दुष्ट प्रचार करणार्‍या लोकांना चपखल उत्तर देत नरेंद्र मोदी यांनी भारतीय घटनेविषयी आदर व्यक्त केला. आपण निवडून आलो हे घटनेच्या सामर्थ्यावरच निवडून आलो असे त्यांनी आवर्जुन सांगितले. आपली निवड नेता म्हणून झाली असली तरी आपण तिच्याकडे पदभार म्हणून पाहत नसून कार्यभार म्हणून पाहत आहोत. हे त्यांचे उद्गार त्यांच्या नम्रतेचे आणि जबाबदारीच्या जाणीवेचे प्रत्यंतर आणून देत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये यापूर्वीच्या सरकारांची आणि नेत्यांचीही प्रशंसा केली. त्यांनी या देशासाठी काहीच केले नाही असे आपण म्हणत नाही, असे नमूद करून तर त्यांनी आपण पक्षीय पातळीच्यावर जाऊ शकतो याची सुखद कल्पना आणून दिली आणि ती सर्वांना दिलासा देणारी आहे. एकंदरीत मोदी यांच्या निवडीपासून त्यांच्या कामाची सुरूवात तरी परिपक्वतेने झाली आहे. याची त्यांच्या चाहत्यांना आणि विरोधकांना सुखद अनुभूती आली.

Leave a Comment