सोनिया शरण कॉंग्रेस

sonia
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस पक्षात पक्षाला चेतना देण्यासाठी काही विचारविनिमय होईल अशी अपेक्षा असतानाच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या भवितव्याची सूत्रे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या हातात देण्याचाच निर्णय घेतला आहे. या गोष्टीचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा काही उपाय सापडत नाही हा एक अर्थ आणि कितीही वाताहत झाली तरी गांधी घराण्याशिवाय पक्षाला कोणीही वाचवू शकणार नाही असा त्यांचा विश्‍वास आहे हा दुसरा अर्थ. खरे म्हणजे आज कॉंग्रेस पक्षाचे पुढे काय होणार असा एक ज्वलंत प्रश्‍न समोर उभा राहिला आहे. वास्तविक हा काही भारतीय जनतेचा प्रश्‍न नाही, तो कॉंग्रेस पक्षाचा प्रश्‍न आहे. कॉंग्रेस पक्ष पूर्ण बुडाला तरी भारतीय जनतेचे काही बिघडणार नाही. तो पक्ष बुडला तरी दुसरा पक्ष उदयाला येईल. जनतेला उद्या चालून भाजपाचा कंटाळा आला तर तो दुसरा पक्ष जनतेला नेतृत्व देईल. तेव्हा कॉंग्रेस पक्ष नामशेष झाला म्हणून जनतेला काही काळजी करण्याचे कारण नाही. कॉंग्रेस बुडणार की तरणार हा कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ज्वलंत प्रश्‍न आहे आणि हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते हा पक्ष बुडू नये यासाठी कसलेही गंभीर प्रयत्न करीत नाहीत.

या बाबत ते स्वत:चीही फसवणूक करीत आहेत आणि जनतेसमोरही चुकीचे चित्र निर्माण करीत आहेत. या फसवणुकीेचा पहिला टप्पा म्हणजे कितीही दारूण पराभव झाला तरी कॉंग्रेस पक्ष पूर्ण संपून जाणार नाही हा गैरसमज. कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आहे आणि ती एक विचारधारा आहे. त्यामुळे हा पक्ष पूर्ण बुडूच शकत नाही असा त्यांचा भ्रम आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे. अर्थात ते त्यांच्या हितासाठीच आवश्यक आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला म्हणून पक्ष ‘अमर’ असतो असा काही नियम नाही. किंबहुना आता आपण ज्या पक्षाला कॉंग्रेस पक्ष म्हणतो तो खरा कॉंग्रेस पक्ष आहे का, असे विचारावे लागणार आहे. १९६९ साली आणि १९७८ साली या पक्षाची दोन शकले झाली होती. त्यातला खरा कॉंग्रेस पक्ष कोणता? हेच प्रश्‍न महत्वाचे आहेत. प्रत्येक विभाजनाच्या वेळी इंदिरा गांधींची सरशी झाली म्हणून त्यांचा गटच अधिकृत पक्ष ठरत गेला. तेव्हा फार खोलात जाऊन विचार केला तर आज सोनिया गांधी नेतृत्व करीत असलेला कॉंग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य संग्रामाचा वारसा सांगणारा कॉंग्रेस पक्ष ठरू शकतो का? हाच प्रश्‍न उद्भवतो. पण वादासाठी तसे मानले तरी त्याला स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्‍वभूमी असल्यामुळे तो कधीच बुडणार नाही असे काही म्हणता येत नाही.

या पक्षाला एक विचारधारा असल्यामुळे तो बुडणार नाही याही म्हणण्यात काही तथ्य नाही. केवळ कॉंग्रेसच नाही तर सगळेच जन्माला आलेले आणि बुडालेले पक्ष विचारधारा घेऊनच जन्माला आलेले असतात आणि विचारधारेसह बुडलेलेही असतात. कॉंग्रेसही बुडणार आहे. गेल्या ५० वर्षात कॉंग्रेस पक्ष क्रमाक्रमाने बुडण्याकडेच वाटचाल करीत आला आहे. एकेकाळी देशव्यापी संघटन असलेल्या या पक्षाने आता तामिळनाडू, सीमांध्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, बिहार या मोठ्या क्षेत्रात आपले स्थान गमावलेले आहे. आता या पक्षाने कितीही उसळी घेतली तरी या राज्यांत त्यांचे पुनरुज्जीवन होणे शक्य नाही. आणीबाणीनंतर १९७७ साली या पक्षाला फार मोठा फटका बसला होता असे म्हटले जाते पण त्यावेळी या पक्षाची एवढी दारूण अवस्था झाली नव्हती. त्यावेळी कॉंग्रेसला लोकसभेच्या १५० जागा मिळाल्या होत्या. अनेक राज्यात सरकारे होती. आता केवळ ४४ जागा मिळाल्या आहेत आणि केवळ चार-दोन राज्यात सत्ता आहे. अशी अवस्था असूनही आपली वाटचाल बुडण्याकडे सुरू आहे हेच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कळत नाही. कॉंग्रेस पक्ष आपली स्थिती सुधारावी यासाठी काहीच प्रयत्न का करीत नाही, असा प्रश्‍न अनेक लोक विचारतात. पण त्यांना हे सांगावे लागेल की या पक्षाच्या नेत्यांना आपली स्थिती बिघडत आहे हेच मुळी मान्य नाही.

मग ते ती स्थिती सुधारावी याकरिता प्रयत्न कसा करतील? त्यांच्या या मन:स्थितीचे दर्शन कालच्या कॉंग्रेसच्या बैठकीत आणि इतरत्रही या नेत्यांच्या बोलण्यातून घडले आहे, घडत आहे. कॉंग्रेस पक्षाचा सर्वात मोठा मानसिक आजार कोणता असेल तर तो आहे घराणेशाही. केवळ सोनिया आणि राहुल गांधीच कॉंग्रेसचे भले करू शकतात असे विश्‍वास ते अजूनही बाळगून आहेत. एका बाजूला स्वातंत्र्य संग्रामाची परंपरा सांगायची आणि दुसर्‍या बाजूला एका घराण्याशिवाय पक्ष चालणार आणि टिकणार नाही अशी भूमिका घ्यायची, या दोन गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. कॉंग्रेसच्या अध:पतनाचे हेच कारण आहे. हा पक्ष १८८५ साली स्थापन झाला पण इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तोपर्यंतची त्याची वाटचाल कोणत्या ‘घराण्याच्या’ नेतृत्वाखाली झाली आहे? १८८५ ते १९६६ ही वाटचाल घराण्याशिवाय होऊ शकत असेल तर तिथून पुढची आणि आताची वाटचाल होण्यासाठी घराण्याच्या कुबडीची गरज का वाटावी? घराण्याबाहेर नेते का तयार झाले नाहीत? एक मोठी विचारधारा पाठीशी असताना आणि स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्‍वभूमी असताना नवे नेते जन्माला घालण्याबाबत हा पक्ष वांझ का ठरला? १२५ वर्षांची परंपरा असणारा हा पक्ष एका पोरकट नेत्यावर एवढा विसंबून का आहे याचा विचार केला पाहिजे. धड लिहायला आणि वाचायला सुद्धा न येणारी एक परदेशी स्त्री आणि त्यांचा राजकीय परिपक्वता नसलेला एक मुलगा हे गांधी-नेहरूंच्या या पक्षाचे आधारस्तंभ ठरावेत, ते या पक्षासाठी अपरिहार्य व्हावेत ही या पक्षाची शोकांतिका तर आहेच, पण हा पक्ष बुडणार असल्याचे लक्षण सुद्धा आहे.

Leave a Comment