मुंबई – गत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट झाली आहे. पंधरा लाख मतांचे प्रमाण सात लाखांवर घसरल्याने मनसेचेच ‘पानिपत’ झाले आहे.सेनेला ‘औकात’ दाखविण्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनाच महागात पडले,मराठी माणसाने सेनेलाच पसंती दिल्याने आता राज ठाकरे मुंबईत जाहीर सभा घेवून बोलणार आहेत,पण ते साद घालतात की राग आळवतात याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
१५ लाखावरून ७ लाख मते; आता राज ठाकरे काय बोलणार ?
‘औकात’ दाखवण्याचे वक्तव्य करणाऱया राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांचीच जागा दाखवून दिल्यानंतर आता पक्षातर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याच सभेत पक्षाच्या पुढील कार्यक्रमाची दिशा राज ठाकरे स्पष्ट करतील, असे पक्षाचे नेते शिशिर शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱयांची आणि पराभूत उमेदवारांची मंगळवारी सकाळी ‘राजगडा’वर चिंतन बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांना राज ठाकरे जाहीर सभेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलेच नाही तर आपली मते शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे पंधरा लाख मते मिळाली होती तर यावेळी अवघी सात लाख मते मिळाली असून मनसेचे सर्वच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहेत. .