शरद पवार २३ मे रोजी राष्ट्रवादी नेत्यांची हजेरी घेणार

pawar_43
मुंबई – आत्ताच्या लोकसभा निवडणुकात २१ जागा लढवून केवळ चार जागांवर विजयी होणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी शरद पवार २३ मे रोजी घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा राष्ट्रवादीला चार जागा कमी मिळाल्या आहेत इतकेच नव्हे तर मतांची टक्केवारीही घटली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात झालेली लक्षणीय घटही पवारांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. याचाच जबाब घेण्यासाठी पवार यांनी मंत्री, खासदार, लोकसभा उमेदवार, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्याबरोबरच विधानसभेसाठीच्या तयारीवरही चर्चा होईल असे सांगितले जात आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर पवार यांचा अधिक रोख राहिल असेही समजते. आव्हाड यांच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही तर जाधव यांच्या रायगड रत्नागिरी जिल्ह्याबाबतही तीच परिस्थिती आहे.

लोकसभेत यंदा काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्याने विधानसभेत त्यांच्यासोबत युती केली तर त्याचा वाईट परिणाम राष्ट्रवादीला भोगावा लागेल असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे मात्र पवार युतीबाबत ठाम आहेत असेही सांगितले जात आहे. याच बैठकीत विधानसभा निवडणुकांबाबत कांही नवे डावपेच आखले जातील असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment