रत्नागिरी – कोकणात कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांचे साम्राज्य ‘खालसा ‘ करण्यात मोलाची कामगिरी बजाविणारे आणि राष्ट्रवादीतून निलंबित झालेले आमदार दीपक केसरकर आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवताना राष्ट्रवादीच्या दबावालाही ते बळी पडले नाहीत,त्यांच्या भूमिकेमुळे राणेंच्या साम्राज्याला सुरुंग लागला गेला आणि शिवसेनेला त्याचा मोठा फायदा झाला.
दीपक केसरकर सेनेच्या वाटेवर !
निवडणूक काळात रत्नागिरी शहरातील प्रचारसभेत बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता, तर निवडणूक निकालानंतर रविवारी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित खासदार राऊत यांनी केसरकरांसाठी जणू पायघडय़ाच घातल्या. ‘आमदार केसरकरांसारखी व्यक्ती विधानसभेत महायुतीतर्फे निवडून आल्यास मंत्री बनू शकते’, असेही राऊत यांनी सूचकपणे नमूद केले.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी मात्र या निवडणुकीत राणेंविरोधी भूमिका घेतलेल्या केसरकरांसह पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सतत फटकारण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे आमदार केसरकर व हकालपट्टी झालेले जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांचे समर्थक कार्यकर्ते अत्यंत दुखावले आहेत.आणि ते सेनेच्या वाटेवर आहे, सेनेकडूनही त्यांना प्राधान्य मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात आणि राज्यात निर्माण झालेले राजकीय वातावरण लक्षात घेता काँग्रेस आघाडीबरोबर राहण्यात फारसे राजकीय भवितव्य नसल्याचाही युक्तिवाद राजकीय आखाड्यात आहे. खुद्द आमदार केसरकरांशी या संदर्भात संपर्क साधला असता, राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.