300 विद्यार्थिनींच्या अपहरणाने नायजेरियात प्रक्षोभ

nigeria
पॅरिस – बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियातील 300 मुलींचे अपहरण केल्याने नायजेरिया समवेतच आता शेजारी राष्ट्रांमध्येही संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे. कॅमरूनचे राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांनी इस्लामी बंडखोरांविरुद्ध युद्ध छेडण्याची घोषणा केली आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नायजेरिया व त्याच्या शेजारी राष्ट्रांनी एकत्रितपणे बोको हरामचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली आहे.

300 हून अधिक शालेय मुलींचे अपहरण केल्यामुळे हे इस्लामी बंडखोर जगातील सर्व राष्ट्रांच्या संतापाचे धनी बनले आहेत. पॅरिस येथे या संदर्भात झालेल्या एका बैठकीत नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन तसेच बेनिन, चाड, कॅमरून या शेजारी राष्ट्रांनी बोको हरामवर कारवाई करण्याच्या योजनेला हिरवा कंदिल दाखविला आहे. 2014 मध्ये या क्रूर दहशतवादी संघटनेने 2,000 निष्पाप लोकांचा बळी घेतला असल्याचा आरोप आहे.

या बैठकीपूर्वी बोको हरामने केलेल्या हल्ल्यात एका चिनी कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. कॅमरूनमधून 10 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. याच वेळी या संघटनेने आणखी घातक कारवाया करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रेंकोइस होलांडे यांनी आपण दहशतवाद्यांच्या कारवायांची गंभीरता जाणली असून याबाबत संयुक्तरीत्या प्रयत्न करण्याची व त्यासाठी गुप्तपणे इत्थंभूत माहिती काढून त्याच्या आधारे अत्यंत काळजीपूर्वक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले.