नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट होत चालला आहे. काल रुपयाची किंमत पुन्हा एकदा वधारली आणि गेल्या अकरा महिन्यातला बळकट होण्याचा उच्चांक नोंदला गेला. सोमवारी सकाळी तर रुपया ३२ पैशांनी वधारला आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५८ रुपये ४७ पैसे एवढे नोंदले गेले.
रुपया बळकट होण्याचा क्रम जारी
दोन दिवसांपूर्वी रुपया वधारून गेल्या वर्षीच्या १८ जून रोजी झालेली घसरण सावरली गेली आणि रुपयाची किंमत ५८ रुपये ८० पैसे प्रती डॉलर अशी झाली. केंद्रात भाजपाचे सरकार येणार या शक्यतेने सुरू झालेली ही प्रगती गेला आठवडाभर जोरदारपणे नोंदली जात आहे. आठवडाभरामध्ये रुपया १२५ पैशांनी सुधारला आहे.
काही बँकांनी डॉलरची विक्री करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर काही निर्यातदार सुद्धा डॉलर विक्रीला काढत आहेत. परदेशातले काही भांडवल भारतात वेगाने यायला लागले असून ते डॉलरच्या स्वरूपात येत आहे. म्हणजे बाजारात डॉलरची उपलब्धता वाढून डॉलरची किंमत कमी तर रुपयाची किंमत वाढत आहे.