भारताचे राष्ट्रपिता म.गांधी यांनी आपला मुलगा हरिलाल याला त्याने आठ वर्षीय मुलीवर केलेल्या बलात्काराबद्ल कानउघाडणी करण्यासाठी १९३५ साली लिहिलेल्या तीन खासगी पत्रांचा लिलाव ब्रिटनमधील मुलीन्स ऑक्शनतर्फे पुढच्या आठवड्यात केला जाणार असून या पत्रांना ५० ते ६० हजार पौंड किमत येईल असे लिलावकर्त्यांचे म्हणणे आहे. ही पत्रे यापूर्वी कधीच सार्वजनिक रित्या प्रसिद्ध झालेली नाहीत. ही सर्व पत्रे गुजराथीतून लिहिलेली आहेत.
म. गांधीच्या खळबळजनक पत्रांचा लिलाव
गांधीजी आपल्या मुलाला लिहितात, तुझी समस्या माझ्यासाठी देशाच्या स्वातंत्र्याच्या समस्येपेक्षा अधिक अवघड आहे. आठ वर्षाच्या मनूवर ती आजोबांसह साबरमती आश्रमात आली असताना तू बळजबरी केलीस आणि त्यानंतर तिच्यावर उपचार करावे लागले हे मला समजले आहे. दुसर्या पत्रात ते लिहितात, तू अजूनही दारू पितोस आणि व्यसन करतोस. तू दारू पिण्यापेक्षा तुला मरण यावे असे मला वाटते.
या पत्रांमुळे गांधी आणि त्यांच्या मुलामध्ये असलेले तणावपूर्ण संबंध उघड होत असल्याचे लिलावकर्त्यांचे म्हणणे आहे.
हरिलाल यांना इंग्लंड येथे येऊन बॅरिस्टर बनण्याची इच्छा होती मात्र गांधीजींनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे रागावलेल्या हरिलाल ने १९११ नंतर कुटुंबाबरोबरचे संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर गांधीनी मुलाला पत्रे लिहिली होती. याच पत्रांबरोबर त्यांनी पं.नेहरू यांची बहिण विजयालक्ष्मी यांना लिहिलेल्या २७ पत्रांचाही लिलाव केला जाणार आहे. ही पत्रेही या पूर्वी कधीच प्रसिद्ध झालेली नाहीत.