फोक्सवॅगन भारतात ८०० कोटींची गुंतवणूक करणार

volksagen
जर्मन वाहन कंपनी फोक्सवॅगन भारतात त्यांच्या सेदान व एसयूव्ही कार सादर करत असतानाच व्यवसाय वाढीसाठी १० कोटी युरो म्हणजे सुमारे ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे भारत शाखेचे अध्यक्ष महेश कोदुमुदी यांनी सांगितले. अर्थात ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतात नवीन मॉडेल लाँच करतानाच सुटे भाग भारतातच बनविण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगून ते म्हणाले व्यवसाय विस्ताराचे अनेक पर्याय आमच्यासमोर आहेत आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. भारतात कॉम्पॅक्ट प्रकारात सेदान, एसयूव्ही आणि हचबॅक मॉडेलना मागणी खूप आहे त्यानुसारच आमची नवीन मॉडेल सादर केली जातील. भारत ही कंपनीसाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि जगात अग्रस्थानी जायचे असेल तर या बाजारपेठेत यशस्वी कामगिरी बजावणे आवश्यक आहे.