कॉंग्रेसची धोबीपछाड

modi10
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि तिने कॉंग्रेसला खास धोबीपछाड डावावर चितपट केले. आता काही वर्षे तरी हा पक्ष उठून चालायला लागेल असे दिसत नाही. खरे तर लोेकशाहीत एखादा पक्ष संपावा असे म्हणणे योग्य नाही पण हा पक्ष इतका लोकशाहीशी विसंगत पद्धतीने चालला होता की त्याला एकदा अशा डावाची गरजच होती. या पक्षाला गेल्या १५ वर्षात सोनिया गांधी यांच्याशिवाय कोणी अध्यक्ष मिळाला नव्हता. या पक्षाची परंपरा मोठी आहे पण तिला या गांधी घराण्याने आणि त्याच्या चमच्यांनी कुटुंबाच्या मालमत्तेचे रूप आणले होते. एखाद्या सरंजामशाही जहागिरदाराच्या दारात हुजर्‍यांनी आण गरजवंतांनी माना खाली घालून त्यांच्या कृपेची वाट पहात थांबावे तसे हे नेते त्यांच्या आणि त्यांच्या सल्लागारांच्या दारात थांबत असत. असा प्रश्‍न लोकशाहीशी विसंगत असतो. त्याची फळे त्याला कधी ना कधी मिळतातच. आता या फळासाठी २०१४ साल उजडावे लागले. लागले पण पक्षाची अगदीच वाताहत झाली. कॉंग्रेसला ऐतिहासिक पराभव पत्करावा लागेल असे वाटत होते पण मोदी यांच्या झंझावाती लाटेत कॉंग्रेसचे मडके एवढे वाहून जाईल असे कॉंग्रेस नेत्यांना तर वाटले नव्हतेच पण भाजपाच्याही नेत्यांना वाटले नव्हते.

कॉंग्रेसची पार वाट लागली आहे. कॉंग्रेसचे बळ १०० च्या आसपास असेल असे वाटले होते पण पक्षाला हाफ सेंचुरीही करता आली नाही. मोदी यांचा झंझावात हा केवळ कॉंग्रेसला संपविणारा नाही तर देशाच्या राजकारणातले आघाड्यांचे युग संपविणारा ठरला आहे कारण केन्द्रात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता येत नाही हे चित्र त्यांनी बदलून टाकले आहे. १९८५ नंतर कोणताही पक्ष ती क्षमता दाखवू शकला नव्हता. त्यामुळे देशाच्या राजकारणात एक विकृती आली होती. आघाडीतला सर्वात मोठा पक्ष १५० खासदारांचा आणि त्याचे बहुमत सिद्ध करण्यास मदत करणारा पक्ष २५ खासदाराचा. सरकारचे अस्तित्व त्या २५ जणांवर अवलंबून म्हणून १५० खासदार निवडून आणणार्‍या मोठ्या पक्षाने त्या लहान पक्षाच्या सतत नाकदुर्‍या काढायच्या. लहान पक्ष शिरजोर मोठा पक्ष लाचार असे हे चित्र आपण गेल्या ३० वर्षात पहात होतो. कोणताच पक्ष हे चित्र बदलू शकत नाही असे मानले जात होते कारण स्वबळावर २७२ जागा जिंकणारा कोणी बहाद्दर राहिलेला नाही असे सरसकट मानले जात होते पण ती क्षमता आपल्यात आहे हे मोदी यांनी सिद्ध करून दिले आहे. देशातल्या राजकारणातली विकृती काढून टाकून स्थिर सरकार देण्याचे नवे युग त्यांनी सुरू केले आहे.

सततच्या आघाडया आणि त्यांचा अस्थिर कारभार यामुळे सरकारला खंबीरपणे काही निर्णय घेता येत नव्हते. काही वेळा राष्ट्रीय हिताचा बळी देऊन या प्रादेशिक पक्षांचे हितसंबंध सांभाळावे लागत होते आणि त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागत होते. मोदी यांनी केन्द्रात आता स्थिर सरकार स्थापन तर करावेच पण ते कॉंग्रेस सारखे प्रादेशिक भावनांना पायदळी तुडवणारे असता कामा नये. राज्यातल्या पक्षांच्या विचारांची उपेक्षा न करता राष्ट्रीय निर्णय घेतले पाहिजेत. कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाला अनेक घटक कारणीभूत आहेतच त्याच्यातला तरुण मतदारांचा निर्णायक हिस्सा कोणालाही नाकारता येणार नाही. ज्यांच्या वयाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा मतदारांची मोठी नोंदणी यावेळी झाली होती. त्यांनी पहिल्यांदाच मतदान केले. त्यांनी आवर्जुन मतदान केेले आणि ते मोदी यांना केले. आजवर देशात कोणालाही ४० टक्के मते मिळवता आली नव्हती पण आता भाजपाला तेवढी मते मिळाली आहेत हा सारा तरुण मतदारांच्या मतदानाचा परिणाम आहे. भारतातल्या निवडणुका लाटांवरच होत असतात असे म्हटले जाते आणि आजवर अनेक निवडणुका लाटांवरच झाल्या आहेत पण आजवरच्या लाटा भावनिक मुद्यांवर आधारलेल्या होत्या. तसा कसल्याही भावनिक मुद्याचा आधार या मोदी लाटेला नाही.

मोदी यांनी या लाटेत देशाला गरिबी हटवण्याच्या आश्‍वासना प्रमाणे कसलेही मोठे अवास्तव आश्‍वासन दिलेले नाही. त्यांनी केवळ सुशासनाचे आश्‍वासन दिले आहे. जे वास्तव आहे. १९९० ते ९५ च्या दरम्यान जन्मलेल्या नव मतदारांनी मोदी यांना निवडून दिले आहे. याच काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत देशाला जगातली महाशक्ती बनता येईल असे निदान केले होते. त्यांनी१९१९ साली सुरू झालेली मुक्त अर्थव्यवस्था आणि महाशक्ती होणे यांची सांगड घातली होती. ते या नव्या पिढीचे स्वप्न झाले होते. हे तरुण संपन्न आणि सुखी भारतात रहायला उत्सुक होते. पण कॉंग्रेसच्या सरकारला ते शक्य होणार नाही असे दिसत होते. कॉंग्रेसचे नेते आपण भारताला महाशक्ती करू शकतो असा विश्‍वास तर निर्माण करीत नव्हतेच पण त्याबद्दल बोलतही नव्हते. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंंग यांनी आपल्या एखाद्याही भाषणात तसे साधे म्हटलेही नव्हते. त्यामुळे या नव्या पिढीला आपल्या देशाचे राज्यकर्ते बदलले जात नाहीत तोपर्यंत हे स्वप्न अर्धेच राहणार आहे याची खात्री पटली. ही नवी पिढी आतुर झाली होती. तिला मतदानाचा अधिकार मिळताच तिने तो आपल्या स्वप्नासाठी बजावला.

Leave a Comment