वॉशिग्टन- भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे. अमेरिकेनेही नवीन भारत सरकारबरोबर काम करण्याची तयारी दाखविली आहे . मात्र मोदींना अमेरिका आता व्हीसा देणार का याचे स्पष्ट उत्तर अद्याप दिलेले नाही. गुजराथ मध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत मोदींना आरोपी मानणार्या अमेरिकेने मोदींना अमेरिकेचा व्हीसा नाकारला होता.
मोदींना व्हिसा बाबत अमेरिकेचे अद्यापीही मौन
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जेन साकी यांना या संदर्भात विचारले गेले असता ते म्हणाले की अमेरिकेच्या कायद्यानुसार कोणत्याही देशाचा पंतप्रधान अथवा राष्ट्र प्रमुखाला अे वन व्हिसा आपोआपच दिला जातो. राष्ट्राचे प्रमुख, पंतप्रधान आणि विदेशी सरकारी अधिकारी यांच्यासाठी वेगळे नियम असून त्याप्रमाणे त्यांना व्हिसा दिला जातो.
याचाच अर्थ मोदी पंतप्रधान झाले तर त्यांना ए वन व्हिसा दिला जाणार का याचे थेट उत्तर देण्याचे साकी यांनी टाळले आणि अमेरिकन कायद्याप्रमाणे राष्ट्र प्रमुखांना व्हिसा दिला जातो असेच पुन्हा सांगितले. अर्थात मोदी सरकार सत्तेवर आले तरी त्यांच्याबरोबर काम करण्यास अमेरिका उत्सुक आहे याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.