राज्यात महायुती जोमात;मनसे कोमात

maharesults
मुंबई – देशात भाजपचे ‘कमळ’ फुलले असले तरी महाराष्ट्रातही महायुतीने दमदार वाटचाल सुरु केली आहे मात्र शिवसेनेला धक्का देण्याची गर्जना करणाऱ्या आणि नवनिर्माणाचे वारे कसे वाहील हे सांगणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण वाताहत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुपारपर्यंतही त्यांना एक खातेही उघडता आले नाही पण सेनेच्या विरोधात उमेदवार उतरवूनही मतदारराजाने मनसेला जवळ केले नाही हेच स्पष्ट झाले आहे. मुंबई -ठाण्यात सेना -भाजपचे उमेदवार मतमोजणीत आघाडीवर आहेत. अंतिम निकालात काय होईल हा भाग नंतरचा असला तरी मनसेला आत्मचिंतन करावे लागणार आहे.

संपूर्ण देशाप्रमाणे मुंबईचा कौलही महायुतीच्या बाजूने असून, मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघात तसेच ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली मतदानाची टक्केवारी महायुतीच्या पथ्यावर पडली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मनसे निष्प्रभ ठरल्याचे दिसत आहे. मनसेच्या बहुतेक उमेदवारांना अजून दहा हजाराचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.संपूर्ण देशाबरोबरच मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. देशाची आर्थिक राजधानी आघाडी की, युतीच्या बाजूने कौल देते याविषयी मुंबईकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
मनसेने यावेळी मुंबईत भाजपच्या विरोधात उमेदवार न देता शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळे मराठी मतांच्या विभाजनचा फटका शिवसेना उमेदवारांना बसेल असा अंदाज असला तरी तो फोल ठरण्याची चिन्हे आहेत .

Leave a Comment