मनसेचा अपेक्षाभंग; मतांच्या टक्केवारीत वाढ की घट?

raj thakre
पुणे – सणसणीत … खणखणीत मुलाखत देताना महाराष्ट्रासाठी काय हवे,काय नको याविषयी सडेतोड भूमिका मांडणाऱ्या महाराष्ट्र नावनिर्माण सेनेला मतदारांनी लाथाडल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी लोकसभेचे निकाल पाहता ,शिवसेनेची कोंडी करणाऱ्या मनसेवर ‘खिंडी’त सापडण्याची वेळ ओढवली आहे.

राज्यात दहा जागा लढविणाऱ्या मनसेच्या नाशिकमधील उमेदवाराची अनामत रक्कम जप्त तर पुण्यात अपेक्षाभंग झाल्याने मनसेचा सुपडा साफ झाला आहे. विशेषत;तरुण वर्गावर भिस्त ठेवणाऱ्या मनसेचा करिष्मा राज्यात दिसेल अशी अपेक्षा होती मात्र उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यावर पाणी फिरले आहे. त्यात शिवसेनेला महायुतीत सहभाग घेवून धास्ती घालणाऱ्या मनसेलाच मतांच्या टक्केवारीची धडकी भरली आहे. गत लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते पाहता ,यंदा त्यात वाढ झाली की घट ? हा प्रश्न आगामी वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जातो आणि तोच विधानसभा अथवा पालिका निवडणुकीसाठी जमेचा असतो,त्यामुळे मतांची टक्केवारी गतवेळ पेक्षा किती ? यावरच आता राजकीय चर्चेचा फड रंगणार आहे.

पण सेनेला डिवचताना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी वाट कशी लावतो अशी धमकी दिली होती. मतांचे समीकरण जुळविताना भाजपबरोबर ‘बेरजेचे समीकरण’ करणाऱ्या मनसेकडेच मतदारांनी पाठ फिरविली आणि सेनेच्या पदरात मत टाकून मराठी मते शाबूत असल्याचे दाखवून दिल्याने, सत्ताधारी कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीसाठी एक पर्याय आणि युतीसाठी विरोधक म्हणून स्पर्धेत उतरलेल्या मनसेवरच क्लीनबोल्ड ‘होण्याची वेळ ओढवल्याने आता आव्वाज कुणाचा ?याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.