कॉंग्रेसचे साम्राज्य ‘खालसा’ ; पुण्यावर भाजपचा’ कब्जा ‘

shirole
पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा विजय झाला आहे, परिणामी नेतृत्वहीन असलेल्या कॉंग्रेसचे साम्राज्य ‘खालसा’ झाले आहे,तर मनसेची गतवेळ पेक्षाही अवस्था बिकट झाली आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री पतंगराव कदम यांनाच काय त्यांचे पुत्र आणि युवराज राहुल गांधी यांच्या टीममधील विश्वजित कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे या पराभवाला कारणीभूत कोण ? हा मुद्दा तापविला जाण्याची दाट शक्यता असून टीकेची तोफ माजी खासदार आणि राष्ट्रकुलमुळे ‘पत’ गमावून बसलेल्या सुरेश कलमाडी यांच्यावरचा डागली जाण्याची चिन्हे आहेत.

लोकसभेचा हा मतदारसंघ भाजपने हस्तगत केला असला तरी भाजपला या मतदारसंघातून तशी परंपरा’ आहे. अण्णा जोशी ,प्रदीप रावत यांचा संसद प्रवेश येथूनच झालेला आहे. गतवेळी भाजपमधून अनिल शिरोळे हे उमेदवार होते पण त्यावेळी राष्ट्रवादीने पर्यायाने एकमेकांना ‘पाण्या’त पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुरेशभाई कलमाडी यांच्यात दिलजमाई झाली होती,त्यात मनसेचे रणजीत शिरोळे रिंगणात उतरले होते त्यामुळे मतांचे समीकरण बिनसल्याने अनिल शिरोळे यांना तोटा झाला होता तर सुरेश कलमाडी यांचे विजयाचे ‘गणित’ सुकर झाले होते पण मतांची टक्केवारी फारच घसरली होती.

यंदा कलमाडी यांना कॉंग्रेसच्या ‘हायकमांड’ने डावलले आणि ‘आरजी’यांच्या जवळचे असणार्या विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली मात्र त्यांच्या उमेदवारीने कलमाडीसमर्थक नाराज झाले, पक्षातूनच त्यांच्यावर नवशिक्या असे लेबल लावले गेले. प्रचारात समांतर यंत्रणा राबविण्यामुळे कदमांवर नाराजी मोठी होती. त्यात पिंपरी-चिंचवडवर एकहाती सत्ता असणार्या राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या उमेदवाराला प्रचारासाठी साथ दिली पण त्यांचे मनसुबे आता सफल होणार आहेत.त्यामुळे आघाडी धर्म पाळला पण कॉंग्रेसच्या अंतर्गत वादात अपयशाचे धनी तुम्ही झाला हा मुद्दा आता राष्ट्रवादीकडून रेटण्याची चाल होणार आहे. तर कॉंग्रेसच्या वर्तुळात मतदारसंघनिहाय आकडेवारी घेवून कलमाडी समर्थकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेसच्या पराभवाला कोण कारणीभूत हा मुद्दा आता पेटणार असला तरी मनसेचा कुणाला फायदा झाला यापेक्षा पुण्यातून संसदप्रवेशाची तयारी कशी ‘पाण्या’त गेली यावरच विचारमंथन होणार आहे. भाजपचे अनिल शिरोळे पुण्याचे खासदार झाल्याने कॉंग्रेसला ‘कात्रजचा घाट ‘ मिळाला असला तरी शहर राजकारणाची गणिते आता बदलणार आहेत. विशेष करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला जितकी धोक्याची घंटा आहे त्यापेक्षा अधिक मनसेला तोटा होणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांना अस्तित्वासाठी लढाई करावी लागली पण त्यांच्याविरहित निवडणूक लढविणाऱ्या कॉंग्रेसला यंदा गडही शाबूत ठेवता आला नाही. असेच विश्लेषण राजकीय निरीक्षकांचे आहे.

Leave a Comment