राज्यात दिग्गजांचे भवितव्य आणि मनसेचा करिश्मा काय ?

election_26
मुंबई – महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल, भाजप नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या बड्या राजकीय नेत्यांसोबतच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे या नेत्यांसह अन्य दिग्गज नेते आणि त्यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सगे-सोयरे यांचे भवितव्य उद्या [दि. १६] ठरणार आहे. शिवाय मनसेचा करिश्मा काय ?हेही जगजाहीर होणार आहे.

देशाची सत्ता कुणाकडे ?याकडेच सर्वांचे लक्ष असले तरी महाराष्ट्रात लोकसभेच्या ‘आखाड्या’त कोण-कोण बाजी मारतो, यानुसार आगामी विधानसभा निवडणुकांचे चित्रही काहीसे स्पष्ट होणार आहे. गेले दोन महिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणा-या सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील एकूण ८७९ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.

मुंबईतील चार मतमोजणी केंद्रासह महाराष्ट्रातील ४० केंद्रावर मतमोजणी केली जाणार आहे. ४८ मतदारसंघात १० एप्रिल, १७ एप्रिल आणि २४ एप्रिल या तीन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील १० जागा, दुस-या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १९ मतदारसंघ आणि तिस-या आणि अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ जागांवर मतदान झाले.संपूर्ण महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतही वाढ दिसून आली. ८.०६ कोटी मतदारांपैकी ४.८७ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Comment