मुंबई – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचा सुपडा साफ झाल्याने आघाडी सरकारवर मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आफत ओढवली आहे, परिणामी सरकारलाच ‘घरघर’लागल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसशासित राज्याच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे पुढे केल्याने महाराष्ट्र सरकारच्या भावी वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याच्या सरकारवर ‘घरघर’
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नीलेश राणे यांचा दारूण पराभव झाल्याने त्यांचे वडील, राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्याचवेळी, रोहयोमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवला आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत . पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून हे सगळेच नेते राजीनामा देऊ लागल्याने सरकारचे काय होणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.