मुंबई- निवडणुकांचे निकाल काय असतील याचा साधारण अंदाज आल्यानंतर महाराष्ट्रातील नेतृत्त्वात बदल होण्याचे संकेत दिले गेले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पद सोडावे लागेल असे सांगितले जात आहे. त्याऐवजी बाळासाहेब थोरात, नारायण राणे किवा हर्षवर्धन पाटील यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावली जाईल असे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्राच्या नेतृत्त्वात बदलाचे संकेत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पद सोडावे लागेल असा अंदाज आला असून गेले तीन दिवस ते दिल्लीतच मुक्काम ठोकून आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद गेले तरी दिल्लीतील आपले ११ रेसकोर्स निवासस्थान तरी कायम राहावे म्हणजेच दिल्लीत कांही महत्त्वाची जबाबदारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले असून गेल्या तीन दिवसांत त्यांनी मावळते पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचेही समजते.
चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तीन वर्षे सांभाळले असले तरी त्यांचे मन कधीच महाराष्ट्रात रमलेले नव्हते असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. त्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाचे पद भूषविले असून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना नेहमीच आशीर्वाद दिले आहेत. पण आता मनमोहनसिंग पंतप्रधानपदावर नाहीत व त्यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याने पृथ्वीराज यांना पाठिबा देणारा असा नेता नव्याने शोधण्याची पाळी त्यांच्यावर आली असल्याचेही सांगितले जात आहे.