मोबाईल स्क्रीन फुटले तर आपोआपच होतील दुरूस्त

mobile
युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय येथील संशोधक इंजिनिअर प्रो. स्कॉट व्हाईट आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक नवे प्लॅस्टीक पॉलिमर तयार करण्यात यश मिळविले आहे. याचा उपयोग तुटलेले मोबाईल स्क्रीन, टेनिस रॅकेट, पाण्याचे पाईप, कार बॉनेट, लॅपटॉप स्क्रीन, अगदी सॅटेलाईट दुरूस्तीसाठी होऊ शकणार आहे. आणि विशेष म्हणजे ही दुरूस्ती माणसाला करावी लागणार नाही.

स्कॉट यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाची त्वचा फाटली अथवा भेग पडली तर जशी आपोआप पुन्हा भरली जाते तशाच प्रकारे भेगा पडल्यास आपोआप भरून येतील अशा पॉलिमरवर संशोधन सुरू होते.२००१ साली असे पॉलिमर प्रथम बनविण्यात आले असून अनेक चाचण्यानंतर आता ते वापरण्यायोग्य रित्या बनविले गेले आहे. रक्त वाहू लागल्यानंतर ज्या प्रमाणे रक्ताची गुठळी होऊन रक्तस्त्राव थांबतो त्याच प्रमाणे या पॉलिमरमध्येही अतिसूक्ष्म नलिकांचे एक जाळे तयार करण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या प्लॅस्टीक वस्तूचा पृष्ठभाग तडकेल किवा फुटेल तेव्हा या नलिकांतील रसायन त्या जागी पोहोचून त्या भेगा भरून काढू शकणार आहे. ३ सेंमी पर्यंतच्या भेगा यामुळे दुरूस्त होऊ शकणार आहेत.

याचा उपयोग अनेक वस्तूंसाठी करता येणार आहे. ३५ मिमि. आकाराची भेग या रसायनामुळे २० मिनिटात भरली जाते आणि ३ तासात तुटलेले उपकरण पुन्हा वापरण्यायोग्य होते असाही स्कॉट यांचा दावा आहे. यामुळे मोबाईल वा तत्सम अन्य वस्तूंचे तुटलेले स्क्रीन, पाण्याचे पाईप, कार बॉनेट, खेळांच्या रॅकेट आपोआप दुरूस्त होतीलच पण भविष्यात बंदुकीची गोळी, रॉकेट अथवा बॉम्बमुळे पडणार्‍यां भेगाही याच पद्धतीने भरून काढता येतील असा स्कॉट यांचा दावा आहे.

Leave a Comment