आघाडीत बिघाडीचा सूर ;’बाबां’कडून पुन्हा ‘दादा’ लक्ष्य

ajitpawar_8
मुंबई – लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले ,आता सर्वांना प्रतिक्षा १६ मे रोजीच्या निकालाची आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मतभेद बाजूला ठेवून,शह -काटशहाचे डावपेच विसरून एकमेकांच्या गळ्यात -गळे घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडीचे सूर निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्याना लगावलेल्या टोल्यातून स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाला वित्त विभागाकडून पुरेश मदत मिळत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे पुन्हा टार्गेट केले आहे. काँग्रेसच्या विभागांना राष्ट्रवादीकडून अडचणीत टाकले जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेक वेळा झाला असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व आले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये एकमेकांची स्तुती करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रीमंडळात आरोग्य विभाग काँग्रेसच्या सुरेश शेंट्टीकडे तर वित्त विभाग उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे.