१६ मे ला बारामतीमधून पहिला निकाल !

election
मुंबई – सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया 16 मे रोजी सुरू झाल्यानंतर राज्यातील पहिला निकाल हा बारामती मतदारसंघातून येण्याची दाट शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून फक्त 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बारामतीचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सोमवारी दिली.

देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष 16 मे रोजीच्या निकालाकडे लागले आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईतील तीनही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची रंगीत तालिम सध्या सुरू आहे. मतमोजणीसाठी लागणारी मंडप उभारणी आणि इतर व्यवस्था पूर्ण झाली आहे.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने एकूण 25 हजार कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. आयोगाने प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. यापैकी पर्यवेक्षक आणि सहाय्यक हे राज्य तर सूक्ष्म निरीक्षक हे केंद्रीय सेवेतील अधिकारी असतील, असे सूत्रांनी सांगितले.

16 मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी ही विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल्स टाकण्यात आली आहेत. साधारणत: 15 ते 25 फेऱयांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. बीड, नागपूर, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 25 हून अधिक उमेदवार आहेत. अशा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय 20 टेबल्स असतील. राज्यातील निवडणूक निकालाचे चित्र दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment