भारतात फसवाफसवीचे कॉल्स पाकिस्तानी हेरयंत्रणेकडून

pak
नवी दिल्ली – ज्येष्ठ पोलीस, हेरखाते आणि सैन्याधिकाऱयांच्या कार्यालयात फसवाफसवीचे संदेश येण्याची नवीन क्लृप्ती पाकिस्तानकडून वापरण्याला सुरुवात झाली आहे. फोन करणारे स्वतः सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगून सरकारी कार्यालयातून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यालये, हेरयंत्रणा, पोलीस, संरक्षण व गृहखात्यातील गुप्त माहिती शेजारील राष्ट्राला मिळू नये, यासाठी कर्मचाऱयांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या कॉल्सचे मूळ ठिकाण लपविण्यात येते. माहिती मिळविण्यासाठी परदेशात असणाऱया क्रमांकांचा उपयोग केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली पोलिसातील सर्व विभागांमधील कर्मचाऱयांना फोन करणाऱया व्यक्तीची ओळख पटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फोन करण्यामागील उद्देशही जाणून घेऊन त्याबाबत शंका आल्यास संबंधित कार्यालयामध्ये त्यासंबंधात चौकशी करण्यासही सांगण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार फोन करणारा स्वतःची लष्करी अधिकारी किंवा हेर यंत्रणेतील अधिकारी अशी ओळख देऊन कार्यालयासंबंधात किंवा एखाद्या योजनेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. यासंबंधात पोलीस स्थानके, खास पथक, दहशतवाद प्रतिबंधक दल, लष्करी केंद्रे, मंत्रालये तसेच राष्ट्रीय सुरक्षा केंद्र, इंटेलिजन्स ब्युरो, एनएसजी व एमएचएच्या अधिकाऱयांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्ली पोलीसच्या खास विभागाचे डीसीपी संजीव यादव यांनी सर्व केंद्रांना पाठविलेल्या विशेष निवेदनात फसवणुकीबद्दलच्या कॉलसंदर्भात इपीएबीएक्स एक्स्चेंजला न कळविण्यास सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची शंका आल्यास फोन करणाऱयाचा क्रमांक घेऊन त्यावर मिळालेला संदेश परत पाठविण्यास किंवा येणारा कॉल तोडण्यासही सांगितले आहे.

Leave a Comment