धोकादायक इमारतींची यादी मे अखेरपर्यंत

mumbai
मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळय़ापूर्वी धोकादायक इमारती घोषित करण्यासाठी म्हाडाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईमधील म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाअंतर्गत मोडकळीस आलेल्या आणि अतिधोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. शेवटी या धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. म्हाडा प्रशासनाचे धोकादायक इमारतींच्या पाहणीचे काम सुरू असून मे अखेरपर्यंत मुंबईतील म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येईल, असे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी म्हाडाच्या धोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणाअंतर्गत 16 इमारतींना धोकादायक ठरविण्यात आले होते. यंदाच्या म्हाडाच्या धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करण्याच्या कामाला म्हाडा प्रशासनाने 18 मार्चपासून सुरुवात केली होती. या सर्व्हेक्षणासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अभियांत्रिक, वास्तूशास्त्रज्ञ यांचे पथक नेमले आहे. सदर पथक मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची पाहणी करत आहे. आगामी पावसाळय़ात इमारतींची कोणत्याही स्वरुपाची पडझड आणि जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सदर पाहणी केली जात आहे. म्हाडा प्रशासनातर्फे ज्या इमारती धोकादायक ठरविण्यात येतील त्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी हाती घेतल्या जातील. त्यानंतर या इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन रहिवाशांना केले जाईल.

धोकादायक ठरविलेल्या इमारतींमधील रहिवाशांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हाडा मंडळाच्या संक्रमण शिबिरात केली जाईल. म्हाडा प्रशासनातर्फे ज्या इमारती धोकादायक ठरविण्यात येतील त्या इमारतींमधील रहिवाशांना त्यांची इमारत धोकादायक असल्याची नोटीसही बजावण्यात येईल. इमारतीला तडे जात असतील, माती पडत असेल, इमारतींच्या भेगा रुंदावत असतील, इमारतीचा कोणताही भाग खचला असेल अशी लक्षणे दिसल्यास इमारतीचा संभाव्य धोका लक्षात घेता इमारतीच्या रहिवाशांनी म्हाडा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment