एककल्ली विश्‍लेषण नको

exitpoll_0
राजकीय विश्‍लेषक आणि पत्रकार यांना आपली काही राजकीय मते असतात आणि तशी ती असण्यात काही चूक नाही. त्यांनी ती मते माध्यमातून मांडावीतसुध्दा पण तिथे आपल्या मतांचा आग्रह काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच धरावा आणि तसा न धरल्यास माध्यमे तरी प्रचारी होतातच परंतु अशा विश्‍लेषकांवर लोकांचा विश्‍वास राहत नाही. त्यांचे विश्‍लेषण आणि वस्तुस्थिती यात मोठे अंतर असते. जी विचारसरणी आपल्याला मान्य नाही तिच्यावर तत्वाच्या आधारे टीका जरूर करावी परंतु नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काही विचारवंत पत्रकार समिक्षकांनी काही चुकीच्या भूमिका घेतल्या. सगळ्याच विचारवंतांनी आणि समीक्षकांनी मोदींचे समर्थन केले पाहिजे असे कोणी म्हणणार नाही. परंतु त्यांच्या विरोधकांनी एवढी मजल मारली की मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे विभाजन होईल असे सांगायला सुरूवात केली. अशा एककल्ली विचारवंतांवर मतदारांचा विश्‍वास नाही. असे निदान एक्झिट पोलमधून तरी दिसून आले आहे. कारण एवढा दुष्ट प्रचार करूनसुध्दा मोदी आणि भारतीय जनता पार्टीला कॉंग्रेस पक्षाला कितीतरी जास्त मतदान झालेले आहे.

देशातल्या विविध वृत्तवाहिन्यांनी या काळात राजकीय चर्चांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घडवले आणि नवे नवे विचारवंत, विश्‍लेषक, अभ्यासक यावेळी पडद्यावर आले. या विचारवंतांनी समाजाला मार्गदर्शन होईल असे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण मांडावे आणि निःष्पक्षपातीपणाने राजकीय परिस्थितीचे समीक्षण करावे अशी अपेक्षा बाळगल्यास काही चूक होणार नाही. पण तसे झाले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करून आपली मांडणी केली जी चुकलेली दिसत आहे. महाराष्ट्रातल्या एका सुप्रिध्द चळवळ्या विचारवंताने ३ आठवड्यापूर्वी एका चर्चेत सहभागी होताना, नरेंद्र मोदींची लाट वगैरे काही नाही हे मत प्रस्थापित करण्यासाठी नरेंद्र मोदी मुळात स्पर्धेतच नाहीत असे ठोकून दिले होते. त्यांनी तर स्पष्टपणे सांगून टाकले होते की, मतदानाची तारीख जसजशी जवळ येत जाईल तसतशी पंतप्रधानपदाची खरी चुरस केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यातच असल्याचे दिसून येईल आणि नरेंद्र मोदी तिसर्‍या क्रमांकावर फेकले जाऊन नगण्य ठरतील. अर्थात, त्यावेळीही लोकांना त्यांचे निदान पटले नव्हते आणि आता तर काही प्रश्‍नच नाही. काही घडले तरी कॉंग्रेसचाच प्रभाव आहे असे ठोकून देणार्‍या काही या काही िवचारवंताना आपली विश्‍वासार्हता संपत आहे याचेही भान नाही. आता तर एक्झिट पोलचे निष्कर्ष समोर आले आहेत.

एक्झिट पोलचे निष्कर्ष म्हणजे निकाल नव्हेत. हे सर्वांनाच कळते. या निष्कर्षात आणि प्रत्यक्ष निकालात काही प्रमाणात अंतर असते असाही बहुतेकांचा अंदाज आहे. परंतु यावेळच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार आणि कॉंग्रेसची सत्ता जाणार ही दिशा तरी नक्की दिसून आलेली आहे. मात्र सतत राहुल गांधींची टिमकी वाजवण्याची खोड जडलेले हे एककल्ली पत्रकार आणि विश्‍लेषक उगाचच काही विचित्र समिकरणे मांडून मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भासवून स्वतःचे समाधान करून घेत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचे स्वतःचे समाधान होईल. पण २७० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा अंदाज आलेली रालो आघाडी आणि १०१ जागांच्या पुढे जाण्याची शक्यता नसलेली संपु आघाडी यामध्ये एवढा फरक आहे की काहीही घडले तरी एक्झिट पोलचा हा निष्कर्ष फोल ठरणार नाही आणि या विचारवंतांच्या चिंतनाने अन्य कोणाचेही समाधान होणार नाही. गंमतीचा भाग असा की एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर येताच कॉंग्रेस पक्षाची उच्चस्तरीय बैठक झाली. मात्र अजूनही कॉंग्रेसच्या नेत्यांना आपली सत्ता येईल असे वाटत नाही.

निष्कर्षांमध्ये काहीही म्हटले असले तरी आपल्याला १३० जागा मिळणार असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. कोणीही एवढे आशावादी असायला हरकत नाही. परंतु कॉंग्रेसचे सुपारी घेतलेले एक अभ्यासक कम पत्रकार कम विश्‍लेषक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधी सरकार येईल असे चित्र उभे करत होते. शरद पवारांना महाराष्ट्रात सहा जागा मिळतील असा अंदाज आला आहे आणि त्याच्या जोरावर आपण मजल मारू शकणार नाही. याची जाणीव पवारांना झाली आहे. त्यामुळे ते फार आशावादी नाहीत. पण त्यांच्याबाबतीत हे पत्रकार महाशय मात्र नको एवढे आशावादी आहेत. शेवटी एक्झिट पोल आणि खरे निर्णय यामध्ये ३ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या निर्णयाबाबतीत कोणालाही काही बोलायला ३ दिवसांचा अवधी आहे. तसेच काहीही बोलण्याचे स्वातंत्र्यही आहे. पण या स्वातंत्र्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. कोणी सूर्य पश्‍चिमेला उगवतो असे म्हटले तर ते खोटे पण तसे म्हणण्याचा अधिकार त्याला आहे. पण तसे म्हणायचे की नाही याचा विवेक त्यांना असला पाहिजे.

Leave a Comment