टीम इंडिया इंग्लंडपुर्वी बांगलादेशाचा करणार दौरा

teamindia

मुंबई- आगामी काळात इंग्लंडच्याग दौ-याला जाण्याणपूर्वी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी केली.ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभाग घेतला नाही, त्यांच्या सरावासाठी बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.

बांगलादेश भारतीय उपखंडातच आहे त्यामुळे या सामन्यांचा इंग्लंडच्या वातावरणात कसा उपयोग होईल या प्रश्नांचे पटेल यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आम्ही काही नव्या चेह-यांना संधी देणार असल्याचे ते म्हणाले. या दौ-यात कर्णधार महेंद्रसिंग ढोणी, विराट कोहली यांना विश्रांती दिली जाणार आहे.

याआधीही दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर ढोणी आशिया चषक स्पर्धेत खेळला नव्हता. मात्र त्यानंतर बांगलादेशमध्येच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो सहभागी झाला होता. दरम्यान, इंग्लंड दौ-यात टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि पाच एकदिवसीय मालिकेसह एक टी-२० सामना खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०११मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. या दौ-यात इंग्लंडने टीम इंडियाचा ४-० असा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला चालून आली आहे.

Leave a Comment