गंगा आरतीचे प्रत्येक भारतीयालाच महत्त्व

gangaaarti
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना गंगेची आरती करण्यासाठी परवानगी नाकारली गेल्याची चर्चा जोरात आहे. राजकीय दृष्ट्या त्याला वेगळे महत्त्व आहे आणि त्याचा फायदा उठविण्यासाठी मोदींनीही गंगेची माफी मागण्याची संधी साधली आहे. मात्र केवळ मोदींसाठीच नाही तर प्रत्येक भारतीयासाठीही ही गंगा आरती श्रद्धेचे प्रतीक बनून राहिली आहे.मोदींना वाराणसीत स्वतःचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळांलेला नाही त्यामुळेच त्यांनी गंगाआरतीच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधण्याचा मनसुबा रचला होता. १२ मे रोजी येथे मतदान होत असल्याने त्यांना ही आरती करायची होती. मात्र राजकीय बाब बाजूला ठेवली तर प्रत्येक भारतीयासाठी गंगा आरती फारच जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. या धार्मिक शहराची ती खास ओळख बनली आहे.वास्तविक गंगेची आरती करण्याची प्रथा हरिद्वार आणि हृषीकेश येथे आहे. काशीत ही सुरवात १० वर्षांपूर्वी झाली आणि त्याला वाराणसीच्या नागरिकांकडून फारसा नसला तरी काशी दर्शनाला येणार्‍या देश विदेशी पर्यटकांकडून अलोट प्रतिसाद मिळाला. रोज सायंकाळी प्रचंड गर्दीत होणारी ही आरती पाहणार्‍याला अलौकिक सुखाची प्रचीती देते. काशीत गंगेवर एकूण ८४ घाट आहेत मात्र गंगा आरती केवळ दशाश्वमेध घाटावरच केली जाते आणि प्रेक्षक प्रत्यक्ष घाटावरून किवा बोटीत बसून या आरतीचा अनुभव घेऊ शकतात.पारंपारिक वेशभूषेतील अनेक पुरोहित सायंकाळी मोठमोठे दिवे हातात घेऊन मंत्रोच्चार करू लागतात आणि त्याचवेळी त्यांना शंखनाद, घंटानाद थाळीनादाची साथ दिली जाते. त्यातून निर्माण होणार्‍या अपूर्व तालसंगीतातून , धूपाचा सुगंध दरवळत असतानाच गंगेची तालबद्ध आरती सुरू होते. १ तासांचा हा सोहळा पाहणार्‍याच्या तनामनाचा कब्जा कधी घेतो हे समजतही नाही असे हा अनुभव घेणार्‍याचे म्हणणे आहे.———–

Leave a Comment