रघुराम राजन यांच्या पदाला धोका नाही

rajan_2
दिल्ली – भाजपप्रणीत मोदी सरकार या निवडणुकांनंतर सत्तेवर आले तरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या पदाला कोणताही धोका असणार नाही असे भाजपचे खजिनदार पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. भाजप सरकार आले तर रघुराम राजन यांना पदावरून काढले जाईल अशी चर्चा कांही काळ सुरू होती, त्या चर्चेला गोयल यांच्या स्पष्टीकरणाने पूर्णविराम मिळाला आहे.

गोयल म्हणाले की कुणीतरी दुसर्‍याने रघुराम यांची नेमणूक केली म्हणून त्याना काढून टाकण्याचे आम्हाला कांहीही कारण नाही. रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था आहे आणि कुणीही तिच्या कार्यपद्धतीत ढवळाढवळ करू शकत नाही. कोणत्याच सरकारला तो अधिकार नाही. राजन यांची नेमणूक कायद्यानुसार झाली आहे, त्यात आमच्या आवडीनिवडीचा संबंध येत नाही.

रिझर्व्ह बँक तिचे काम करते आहे आणि महागाई कमी करण्यासाठी उपाययोजनाही आखल्या जात आहेत. मोदी सरकार सत्तेवर आले तर या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या सप्टेंबरमध्ये राजन यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत मात्र या काळात त्यांनी तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे. व्याजकर्जदर वाढल्याने उद्योजकांना जादा गुंतवणक करणे तसेच कामगार भरती करणे अवघड जात आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.