मोदींचा मास्टर स्ट्रोक

modi
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नरेन्द्र मोदी यांनी जोरदार आणि निर्णायक दणका देत सर्वांना अस्वस्थ केले आहे. काल अमेथी मतदारसंघात प्रचार करताना त्यांनी आपण मागास समाजातले आहोत असे उघडपणे सांगितले. मोदी हे भाजपाचे उमेदवार असल्यामुळे उच्च वर्णीय मतदार त्यांच्या बाजूने आहेच पण या जातीच्या कार्डामुळे मागास वर्गाचेही मतदान त्यांना झाले तर त्यांना मोठाच विजय मिळेल अशी भीती त्यांच्या विरोधकांना लागून राहिली आहे. म्हणून मोदींनी आपल्या जातीचा उल्लेख करताच अनेकांनी त्यांच्यावर जातीचे कार्ड वापरल्याचा आरोप करायला सुरूवात केली. या निमित्ताने जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यात आता लालूप्रसाद यादव, नरेन्द्र मोेदी, प्रियंका गांधी, मायावती हे प्रामुख्याने उतरले आहेत. अर्थात यातले सगळे मिळून मोदींना लक्ष्य करायला लागले आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेेश आणि बिहार या दोन राज्यांत मतदान होणार आहे. या मतदानावर जातींचा प्रभाव असतो. या दोन राज्यात मिळून लोकसभेच्या १२० जागा आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाचे वेळापत्रक जाहीर केले तेव्हाच नरेन्द्र मोदी यांनी या दोन राज्यात सर्वात शेवटी मतदान होणार आहे हे ताडले होते आणि आपली रणनीती आखली होती.

मोदी देशभर विकासाच्या मुद्यावर प्रचार करतील आणि शेवटच्या टप्प्यात या दोन राज्यात जातींचा आधार घेतील असे तेव्हाच ठरले होते. आता मोदी यांनी कालच अमेथीत भाषण करताना जातीचे कार्ड वापरले. आपण मागास जातीत जन्माला आलो आहोत याचा प्रियंका वड्रा या तुच्छतेने उल्लेख करीत आहेत असा कांगावा करून त्यांनी सगळ्या प्रचाराला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला. खरे तर प्रियंका वड्रा यांनी मोदींच्या जातीचा असा थेट उल्लेख केला नव्हता. त्या मोदी हे नीच राजकारण करीत आहेत असे म्हणाल्या होत्या. मोदींनी आपल्या हुतात्मा वडलांचा (म्हणजे राजीव गांधी यांचा) अपमान केला अशी तक्रार करून प्रियंका वड्रा यांनी मोदींच्या राजकारणाला ‘नीचली’ राजनीती असे म्हटले होते. हा सुद्धा एक कांगावा आहे. आजवर राजीव गांधी यांचा उल्लेख शहीद असा केला नव्हता. पण प्रियंका यांनी या गदारोळात आपल्या वडलांच्या कथित हौतात्म्याचा असा फायदा उठवण्याचा प्रयत्न करणे हीच खरी नीचली राजनीती आहे पण प्रियंका गांधी यांनी ते विशेषण नरेन्द्र मोदी यांच्या राजकारणाला बहाल केले. हा प्रियंका गांधी याचा कांगावाच आहे पण मोदी यांना या दोन राज्यात प्रचार करताना जातीचा मुद्दा उपस्थित करायचाच होता. त्यांनाही हेच निमित्त मिळाले.

त्यांनी प्रियंका वड्रा यांच्या वाक्यातला नीचली हा शब्द उचलला आणि त्याला फिरवून, आपल्या जातीचा उल्लेख केल्याचा आरोप केला. एकंदर त्यांनी आपली जात सांगण्याची ही संधी साधली. मोदींनी आताच जातीय कार्ड बाहेर का काढले यावर आता सर्वच जण आपापली मते मांडायला लागले आहेत. काही लोकांचे असे अनुमान आहे की, बिहार आणि उत्तर प्रदेशात लालू प्रसाद आणि मायावती जोमाने पुढे येत आहेत. मतदारांवर मोदी यांचाच एकट्याचा प्रभाव असल्याची चर्चा होत होती आणि बाकी सर्वांची वाताहत होईल असे बोलले जात होते. पण, स्थिती तशी नाही. हे दोन नेते मोदींना आव्हान देण्यास पुढे सरसावत आहेत असे दिसत आहे. या दोन्ही राज्यातल्या मुस्लिम मतदारांच्या मनातला संभ्रम कमी होत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात मायावती यांच्या मागे तर बिहारात लालूंच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम मतदारांच्या मनातला संभ्रम हे भाजपाचे भांडवल असते पण तो संपला आणि त्यांनी धोरणात्मक दृष्ट्या मतदान केले की भाजपाला शह बसतो असे मानले जाते. तसा संभ्रम संपत आला आहे. त्यामुळे मोदी घाबरले आहेत आणि त्या घबराटीपोटी त्यांनी या दोन राज्यातल्या या दोन फेर्‍यांत आपण मागास जातीचे असल्याचे सांगायला सुरूवात केली आहे. हे सारे काही पत्रकारांचे विश्‍लेषण आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही.

मोदींनी आज नाही तर गेल्या ऑक्टोबरमध्येच जातीचे कार्ड वापरायचे ठरवले होते. मुळात राष्ट्रीय स्वयंसेेवक संघाने मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतानाच त्यांची जात हा घटक महत्त्वाचा मानला होता. त्यांची ही उमेदवारी जाहीर होताच उत्तर प्रदेशातले भाजपाचे प्रभारी म्हणून मोदींचे निकटचे सहकारी अमित शहा यांची निवड करण्यात आली. त्यांनी तेव्हापासून उत्तर प्रदेशात अनेक जाती जमातींच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीतून त्यांनी मोदींची जात समाजाच्या अनेक लोकांपर्यंत पोचवली आहे. मोदी ओबीसी आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात या वर्गाची संख्या मोठी आहे. तेव्हा मोदींनी जातीचे कार्ड आताच बाहेर काढले हे म्हणणे काही खरे नाही. पण ते बाहेर काढले असल्याचे दिसायला लागताच त्यावर मायावती आणि लालू प्रसाद हे दोघे तुटून पडले. हेच दोघे का ? याला कारण आहे. मोदींनी जातीचे कार्ड वापरले तर याच दोघांचे मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा या दोघांनाच मोदींचे हे कार्ड फार त्रस्त करायला लागले आहे. असो. या लोकांचा ढांेंगीपणा असा आहे की, या दोघांनी याच आधारावर आपले सारे राजकारण बांधले आहे. मायावती यांचे भाषण पिछडा वर्ग या शब्दाशिवाय संपत नाही. त्या किंवा लालू प्रसाद किंवा अन्य नेते जातींचा वापर करतात तो सामाजिक न्यायासाठी असतो पण तोच वापर मोदी करतात तेव्हा मात्र ते जातीचे कार्ड असते.

Leave a Comment