भ्रष्ट नक्कल काय कामाची?

rajthkare
राजकारणात प्रत्येकाने आपली कुवत, अनुभव आणि काम यांचा विचार करून आपली शैली ठरवायची असते पण कोणी तरी कोणाची नक्कल करायला निघाला की, त्या अनुकरणाचा फायदा तर होतच नाही पण नुकसान होऊन हसे होण्याची मात्र अधिकच शक्कता असते. राज ठाकरे यांनी नरेन्द्र मोदी यांची नक्कल करीत आता विधानसभा निवडणुकीत आपली हॅट मैदानात टाकायचे ठरवले आहे. त्यांनी मोदींची नक्कल करणे कितपत योग्य आहे हे येत्या १६ तारखेला समजणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील तेव्हा राज ठाकरे नेमके केवढे आहेत हे समजून येणार आहे. भाजपा आणि कॉंग्रेस हे या निवडणुकीतले मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. पण त्यातल्या कोणाचे काहीही झाले तरीही त्यावरून त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. मनसेसाठी मात्र ही निवडणूक आणि तिचे निकाल फार महत्त्वाचे आहेत कारण हा पक्ष टिकणार की नाही याचा फैसला या निकालावरून होणार आहे. या निवडणुकीत जे काही घडणार आहे त्याचा या पक्षाच्या अस्तित्वावर आणि वाटचालीवर निर्णायक परिणाम होणार आहे. हा पक्ष २००५ साली स्थापन झाला आणि २००९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्याच्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण त्या पक्षाची पहिलीच निवडणूक होती.

सुदैवाने या निवडणुकीत या पक्षाच्या लायकीपेक्षा जास्त मते मिळाली. कारण नाविन्य होते आणि राज ठाकरे आकर्षक भाषण करत असल्यामुळे ते कामाच्या बाबतीत तेवढेच सक्षम असतील असा भास लोकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खरे स्वरूप लोकांसमोर आले आणि आपण या पक्षाला आणि राज ठाकरे यांना जेवढे महत्त्व देत आहोत तेवढे ते अनावश्यक आहे याचा साक्षात्कार लोकांना झाला. १६ मे रोजी या सार्‍या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. मात्र राज ठाकरे या निवडणुकीत वाईट कामगिरी झाली तरी तिचे समर्थनच करणार आहेत. मुळात आपल्याला लोकसभा निवडणुकीत कसलीही रूची नव्हती, आपण विधानसभेवर लक्ष केंद्रित करणार आहोत असे म्हणून ते लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचे आपल्या परीने समर्थन करतील. त्यांच्या स्वतःच्या मनाची समजूत त्यामुळे पटेल परंतु लोकांना ते पटणार नाही. कारण नाही म्हटले तरी मनसेने लोकसभा निवडणुकीत सुध्दा बरीच रूची घेतलेली होती. अशी सारी वाताहत होत असताना आणि पक्ष कालगत होण्याच्या मार्गाला लागला असला तरी राज ठाकरे हे मात्र अजूनही भानावर येत नाहीत. त्यांनी विधानसभा निवडणुकीचे धोरण आखायला सुरूवात केली आहे.

नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून सार्‍या देशभर फिरवले आणि त्याचे काही फायदे भाजपाला मिळत आहेत. त्याच धर्तीवर राज ठाकरे स्वतःला मनसेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणार आहेत. म्हणजे विधानसभा निवडणुकीत ते मोदींची नक्कल करणार आहेत. राज ठाकरे यांची स्वतःची पात्रता मुख्यमंत्री होण्याची नाही. पण ते मोदींच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. मोदींच्या भोवती आकर्षण निर्माण झाले कारण मोदी २००१ पासून देशाला माहीत झाले होते. जवळपास १५ वर्षे त्यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आलेला आहे. त्यांनी सुशासनाचा प्रयोग यशस्वीपणे राबवून दाखवलेला आहे. मोदींच्या विषयी असणारे आकर्षण नेमके हेच आहे आणि या बाबतीत राज ठाकरे यांच्या खात्यावर एकसुध्दा रुपया जमा नाही. त्यांनी आजपर्यंत प्रशासनात कोणतेही पद घेऊन ते राबवून दाखवलेले नाही. त्यांनी कधी मंत्रिपद घेतलेले नाही. साधा आमदार तर सोडाच पण नगरसेवक म्हणूनसुध्दा त्यांनी आपल्या कार्यकुशलतेचे प्रदर्शन घडवलेले नाही. त्यांच्या हातात नाशिकची महानगरपालिका आली पण तिथे त्यांना आपल्या कामाची चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळे त्यांनी िकतीही डरकाळ्या फोडल्या तरी ते महाराष्ट्राचे मोदी होऊ शकत नाहीत. पण त्यांचा प्रयत्न चालला आहे.

आपल्याला कामाचा अनुभव नसला म्हणून काय झाले एकदा हातात सूत्रे येऊ द्या उत्तम काम करून दाखवीन असा युक्तिवाद ते करतील सुध्दा परंतु तशी तरी खात्री वाटावी असे कोणते काम त्यांनी करून दाखवले आहे हे त्यांना सूचितसुध्दा करता येणार नाही इतका त्यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या खात्यावर भोपळा जमा आहे. गेल्या आठवड्या इंडिया टुडे या इंग्रजी साप्ताहिकाने महाराष्ट्रात एक सर्वेक्षण केले आणि जनतेला कोणता नेता मुख्यमंत्री म्हणून हवा आहे याचा अदमास घेतला तेव्हा केवळ ८ टक्के मतदारांनी राज ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला. ही गोष्ट बरीच सूचक आहे. याबाबतीत आणि प्रशासन चालवून दाखवण्याची संधी असूनसुध्दा तिथे आपली चुणूक न दाखवल्याच्या बाबतीत राज ठाकरे यांची राहुल गांधींशी चांगलीच बरोबरी होऊ शकते. कारण राहुल गांधींनीही अशा पध्दतीने प्रशासकीय जबाबदारी टाळलेली आहे आणि घराण्याचे नाव घेऊन ते राजकारणात संधी मागत आहेत. राज ठाकरेसुध्दा घराण्याच्या नावाशिवाय दुसरे कोणतेच भांडवल बाळगून नाहीत. मात्र आपण भाषणाच्या जोरावर मोठी मते खेचून घेऊ शकू असा अनाठायी विश्‍वास त्यांना वाटत आहे.

Leave a Comment