पराभवाची जबाबदारी कोणाची?

election_26
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होणार आहे अशी कॉंग्रेसच्याच नेत्यांना एवढी खात्री आहे की, त्यांनी ते खरेच मानून या पराभवाला जबाबदार कोण? यावर चर्चा सुद्धा सुरू केली आहे. अशा प्रकारच्या निकालांना मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले जाते. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरून मुख्यमंत्रीपदावरून सुद्धा हटवले जाईल, अशी चर्चा कॉंग्रेस पक्षात आहे. राज्यातले मतदान पार पडल्यानंतर पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेने राज्यातल्या लोकसभेच्या कॉंग्रेसच्या जागा घटणार असा खात्रीशीर अहवाल दिला आहे. भाजपा-सेना युतीला चांगले यश मिळणार व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव होणार असे कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह सर्वजण मानून चालले आहेत. महायुतीच्या नेत्यांना विजयाची एवढी खात्री आहे की, त्यातल्या काही नेत्यांनी धन्यवाद दौरे सुरू केले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघातले आगामी विधानसभा निवडणुकीतले आडाखेही मांडायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात भाजपा-सेना महायुती आणि केंद्रात एन.डी.ए. आघाडीची सरशी होणार अशा खात्रीतून महायुतीच्या कोणत्या नेत्यांचा केंद्राच्या मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट होणार याचीही गणिते मांडली जायला लागली आहेत. एका बाजूला हा आत्मविश्‍वास दिसत आहे, तो कितपत व्यवहार्य आणि सार्थ आहे हे १६ तारखेलाच कळणार आहे. पण आताचे एकूण वातावरण कॉंग्रेसचा दारूण पराभव आणि भाजपाचा घवघवीत विजय असे आहे.

कॉंग्रेस पक्षाला तर पराभवाच्या कल्पनेने खूप ग्रासले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसला फार तर आठ जागा मिळतील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार ते पाच जागा मिळतील असे कॉंग्रेस पक्षाचे विश्‍लेषण आहे. कॉंग्रेसला २००९ च्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १७ जागा मिळाल्या होत्या, त्या सात किंवा आठपर्यंत खाली येतील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा आठ वरून चार ते पाच वर खाली येतील असे कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेचे म्हणणे आहे. बाहेरच्या एखाद्या संस्थेने सर्वेक्षण करून असे निष्कर्ष काढले तर ते धुडकावून लावणे सोपे असते, पण आपल्याच पक्षातल्या अंतर्गत यंत्रणेने असे निष्कर्ष काढले तर ते मान्य करावे लागतात. तसे मान्य करून कॉंग्रेस पक्षात आता या पराभवाची जबाबदारी कोणाची? यावर सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. निकाल लागण्याच्या आधीच निकालावरून जबाबदारी निश्‍चित करण्याबाबत चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असेल. विशेषत: महाराष्ट्रात तरी. महाराष्ट्रातली मतदानाची शेवटची फेरी २४ एप्रिलला संपली आणि निकाल १६ मे ला लागणार आहे. या दोन्हींच्या मध्ये जवळपास तीन आठवड्याचे अंतर असल्यामुळे चर्चेला भरपूर वेळ सुद्धा आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला तर पृथ्वीराज चव्हाण यांचे पद धोक्यात येईल आणि त्यांच्या जागी अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली जाईल असे संकेत मिळत आहेत. अर्थात हे सगळे संकेतच आहेत. ते सगळे खरे मानण्याचे कारण नाही, परंतु त्या संकेतांच्या आधारावर नेतेमंडळींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हे संकेत गांभीर्याने घ्यावे लागतात. पश्‍चिम महाराष्ट्रात महायुतीला पाय सुद्धा ठेवायला जागा नाही. परंतु यावेळी महायुती या भागात बरीच मुसंडी मारणार असे दिसत आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात महायुतीचा झेंडा फडकेल असे समजले जात आहे. तसे झाल्यास तो पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव मानला जाईल. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते या पराभवाला पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मनामध्ये बिंबविण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला अशोक चव्हाण यांनी अनुमोदन दिले तर महाराष्ट्रात नेतृत्व बदल होऊ शकेल. किंबहुना तो होणार असे गृहित धरून पृथ्वीराज चव्हाण कामाला लागले आहेत. महाराष्ट्रतली कॉंग्रेसची प्रचाराची धुरा आपण एकट्यानेच कशी सांभाळली ही गोष्ट ते पक्षश्रेष्ठींच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामागे आपली उचलबांगडी होऊ नये हाच हेतू आहे.

२००९ साली कॉंग्रेसला राज्यात १७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. ही गोष्ट अशोक चव्हाण पक्षश्रेष्ठींपुढे मांडू शकतात. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस पक्षात बर्‍याच उलाढाली अपेक्षित आहेत. होणार्‍या पराभवाला कोणाला जबाबदार धरावे, यावरून पक्षात आताच स्पर्धा सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर ठेवून ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला मते कमी पडली असतील त्या मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार असेल तर त्या आमदाराला पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना आहे. त्यांनी काही आमदारांना तसे बोलून सुद्धा दाखवले आहे. पण या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मोठे मासलेवाईक उत्तर दिले आहे. खासदाराला मते कमी पडल्याची जबाबदारी आमच्यावर टाकता पण त्यांना उमेदवारी देताना मात्र आम्हाला विश्‍वासात घेत नाही, असा एकतर्फी निर्णय चालणार नाही असे आमदारांचे म्हणणे आहे आणि ते बरोबर आहे. आम्ही उमेदवारी कोणालाही देणार पण त्याला मते मिळवून देण्याची जबाबदारी मात्र तुमची, अशी एकतर्फी जबाबदारी टाकणे बरोबर नाही असे या आमदारांचे म्हणणे आहे आणि ते योग्य आहे.

Leave a Comment