दिसामाजी काही तरी ते लिहावे…..

writing
समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगाचे चांगले आकलन होण्यासाठी एक सूत्र दिले आहे. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.’ याचा अर्थ सहज सोपा आहे. आता अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावला आहे. दिसामाजी काही तरी ते लिहिण्याने वजन कमी होते असे त्यांना काही महिलांच्या बाबतीत आढळले आहे. रोज पंधरा मिनिटे लिहिल्याने काही महिलांच्या वजनात थोडी घट झाली आणि याच प्रयोगात असे लिखाण न करणार्‍या महिलांच्या वजनात काही ङ्गरक पडला नाही असे दिसून आले. मात्र या प्रयोगातले लिहीणे हे ‘काहीतरी’ नाही. ते विशेष लिहीणे आहे. ते आपल्या जीवनातल्या काही छंदांविषयी आहे. आपल्या नात्यांविषयी आहे आणि आपल्या जीवनातल्या मूल्यांविषयी आहे.

असे काही तरी लिहिण्याने वजन कसे कमी होईल असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. वजन कमी होण्याचा संबंध तर खाण्याशी आहे. मग लिहिण्याने खाण्यावर काही परिणाम होतो की काय ? त्याचे उत्तर होय असेच आहे. आपण जे काही खातो ते आपल्या शरीराची गरज म्हणूनच खात असतो असे नाही. आपण आपल्या मनाची गरज म्हणूनही बर्‍याच वेळा खात असतो. काही लोकांना चैन पडत नसली की ते काही तरी खात सुटतात. अशा खाण्याने वजन वाढते. मग असे लोक बेचैन का होतात हे पाहिले पाहिजे. त्यांच्या बेचैनीची कारणे कमी केली की त्यांचे बेचैनीपोटी होणारे खाणेही कमी होते आणि त्यांचे वजन कमी होते. असा वाढत्या वजनाशी मानसशास्त्राचा संबंध आहे. म्हणून काही अमेरिकी संशोधकांनी वजन कमी करण्यासाठी मानसशास्त्रीय पाहण्या केल्या.

चार बायका एकत्र आल्या की त्या आपसात बोलता बोलता काही तरी उणीदुणी काढतात. जिचे काही उणे काढले जाते ती बाई उदास होते आणि मनाची उदासी घालवण्यासाठी काही तरी खाते. या प्रयोगात सहभागी होणार्‍या महिलांची अशी उदासी कमी केली गेली. ती कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वत:विषयी, जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोना विषयी काही तरी लिहून काढावे असे त्यांना सांगण्यात आले. लिहून आपले मन मोकळे केले की या महिलांचे बेचैनी पोटी खाणे बंद झाले. परिणामी वजनात घट झाली. असे लिखाण न करणार्‍या महिलांचे वजन आहे तसेच राहिले.

Leave a Comment