डॉ. दाभोळकर यांना खरी श्रद्धांजली

dabholkar_18
सध्या सामाजिक सुधारणांची प्रक्रियाच बंद झाली आहे. अशी अस्वस्थता समाजात पसरली असतानाच सामाजिक क्षेत्रात काल एक नवे पाऊल पडले आहे. हे पाऊल भटक्या समाजात गणल्या जाणार्‍या वैदू जातीने टाकले आहे. या समाजात आजवर जात पंचायतीच्या माध्यमातून न्यायदान केले जात असे, पण आता ही जात पंचायत बरखास्त करण्यात आली आहे. ज्या प्रकरणाचा निकाल लावण्याचा आपल्याला अधिकार नाही त्या प्रकरणांचा निकाल आपण लावणार नाही, कोणालाही जातीतून बहिकृत करणार नाही असा निर्णय घेऊन पंचायतीच्या ऐवजी वैदू समाज विकास समिती स्थापन केली आहे. जात पंचायतीमुळे समाजाच्या प्रगतीचा वेग रोखला जात होता. ही उलटी चाल बंद करून आता समाजाचे पाऊल पुढे टाकणारी विकास समिती स्थापन केली आहे. या कामामागची प्रेरणा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आहे. दाभोळकर यांच्या हत्येला सहा महिने उलटून गेले, परंतु त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध अजून लागलेला नाही. त्यांना काल खरी श्रद्धांजली वाहिली गेली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी सुरू केलेल्या कामाला या समितीच्या रुपाने काल एक छोटेसे फळ आले आहे. त्यांची कन्या मुक्ता दाभोळकर हिने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या वैदू समाजाची जात पंचायत बरखास्त करायला लावली. वैदू समाजाचे मुंबईत झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

जात पंचायतीचे स्वरूप ज्या कोणाला माहीत असेल त्याला जात पंचायत बरखास्त करणे हे किती अवघड आहे याची जाणीव होईल. तसे तर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा या मोठ्या संख्येने असलेल्या तसेच अन्यही काही जातींच्या जात पंचायती अस्तित्वात नाहीत. जातीशी द्रोह करून ब्राह्मण किंवा मराठा समाजातल्या एखाद्या मुलीने किंवा मुलाने आंतरजातीय विवाह केला तर त्याला जातीतून बहिष्कृत केले जाते असे काही घडत नाही. म्हणजे हिंदू समाजातल्या काही जातींनी जात पंचायती बरखास्तच केलेल्या आहेत. मात्र ज्या जातींमध्ये आणि पोटजातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्या जाती-पोटजातींच्या पंचायती अजूनही जारी आहेत आणि ज्या जातीतले लोक जातीतून बहिष्कृत होण्यास घाबरतात, जातीने बहिष्कृत केल्यास सुखाने जगू शकत नाहीत अशा जातीतल्याच जात पंचायती जारी आहेत. या पंचायतीतले पंच मोठे मुजोर आणि तितकेच अज्ञानी असतात. एखाद्या कुटुंबातल्या मुलाने किंवा मुलीने दुसर्‍या जातीत किंवा उपजातीत जरी विवाह केला तरी हे जात पंच त्या कुटुंबावर हजारो रुपयांचा दंड बसवतात आणि बहिष्काराला घाबरणारे असे लोक दंड भरून मोकळे सुद्धा होऊन जातात, पण जातीविरुद्ध बंड करत नाहीत आणि पंचांना धुडकावून लावत नाहीत.
अशा लोकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन जात पंचायतीचे पंच लोकांची लूट करतात. आपण जातीशी वैर घेतले तर आपल्या मुला-मुलींचे विवाह होणार नाहीत. जातीतल्या कोणाच्याही शुभ कार्याला आपल्याला बोलावले जाणार नाही आणि आपल्या घरातल्या सुख-दु:खाच्या प्रसंगाला जातीचे कोणीही हजर राहणार नाही अशी दहशत या लोकांच्या मनात असते. तिचा गैरफायदा घेऊन पंच मंडळी जी मनमानी करतात तिचे समाजावर वाईट परिणाम होतात. कारण पंचांचे न्याय देण्याचे निकष काही ठरलेले नाहीत, लिहिलेलेही नाहीत आणि जो तोंडी न्याय दिला जात असतो त्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही. जात पंचायतीच्या पंचांना मुलीने शिकणे गैर वाटत असेल तर ते पंच मुलीला शाळेत पाठविणार्‍या लोकांना हजारो रुपयांचा दंड करतात. काही जातींमध्ये महिलांनी बुरखा नाकारला तर दंड होतो, काही जातीत तर इतक्या वाईट प्रथा आहेत की, त्या सांगताही येत नाहीत. महाराष्ट्रातल्या एका भटक्या जातीमध्ये शौच्याला पाणी घेऊन जाण्यावर बंदी आहे. आता अशा कालबाह्य कल्पना या जात पंचायती लोकांवर लादत असतील तर लोकांना शिक्षण आणि आरोग्य कसे लाभणार? मुलींच्या शिक्षणावर तर अनेक जातीत बंदी आहे. या समाजातल्या मुली नेहमीच अशिक्षित राहतात.
या सगळ्या रूढींच्या आधारावर हे जातीतले पंच हजारो रुपये कमवतात आणि त्यामुळे जात पंचायत या व्यवस्थेत त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. म्हणून या लोकांनी जात पंचायतीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या काही कार्यकर्त्यांना मारहाण सुद्धा केली आहे. पण अशा प्रकारच्या विरोधाची तमा न बाळगता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वैदू समाजाची जात पंचायत बरखास्त केली. म्हणजे त्या समाजातल्या लोकांनाच समावून सांगून ती बरखास्त करायला लावली. त्या जात पंचायतीचे नाव आता वैदू समाज विकास समिती असे करण्यात आले आहे आणि ही समिती आता जात पंचायतीसारखे काम करणार नाही असे ठरले आहे. आता कोणालाही जातीतून बहिष्कृत केले जाणार नाही असे वचन या समितीने दिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबद्दल सगळ्यांचेच चांगले मत आहे, परंतु या समितीने लोकांच्या श्रद्धांवर टीका करण्यापेक्षा त्यांना विधायक पर्याय दिले पाहिजेत असे लोकांचे म्हणणे असते आणि तसा विचार करूनच अंनिसचे कार्यकर्ते केवळ जात पंचायत बरखास्त करून थांबलेले नाहीत तर जात पंचायतीला पर्याय म्हणून समिती स्थापन करून विधायक कामाला प्रोत्साहन दिले आहे. अन्यही जातींनी त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

Leave a Comment