टाटा ट्रस्ट करणार महाराष्ट्रात गुंतवणूक

ratantata
महाराष्ट्राला सध्या औद्योगिक विकासासाठी गुंतवणुकीची तातडीची गरज भासत असतानाच टाटा ट्रस्ट विविध क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्यात या संदर्भात आज सह्याद्री गेस्ट हाऊसवर बैठक होत असून त्यात या योजनेला अतिम स्वरूप दिले जाईल असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

टाटा ट्रस्टने पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीकडे जादा कल दाखविला आहे. आज होत असलेल्या बैठकीत ट्रस्ट आणि सरकार यांच्यातील सहकार्याची रूपरेषा निश्चत केली जाणार असल्याचे समजते. मुख्य सचिव सहारिया आणि त्यांची टीम तसेच टाटा ट्रस्टचे चार वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राज्यात पर्यटनाला खूप वाव असल्याने रतन टाटा यांनी या क्षेत्रात अधिक रस दाखविला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात जागतिक दर्जाचे खासगी विद्यापीठ उभारण्याची तयारीही दाखविली आहे. टाटा ट्रस्टच्या गुंतवणुकीचा महाराष्ट्राच्या विकासासाठी खूपच फायदा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील म्हणाले की आम्हाला खासगी भागीदारांची गरज आहेच कारण सरकारच्या गुंतवणुकीला मर्यादा येतात. चांगली हॉटेल्स, रेस्टॉरंटस, एटीएम, रेस्टरूम्स, पर्यटन स्थळी वायफाय सारख्या सुविधा असतील तर पर्यटन क्षेत्राचा विकास वेगाने होईल. यात नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्यावर भर दिला जाईल तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यावरही भर दिला जाईल.

Leave a Comment