ग्लेन मॅक्सवेलने केली चेन्नईची धुलाई

glenn
कटक : किंग्ज इलेव्हन पंजाबचा दमदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करुन चेन्नई सुपर किंगच्या गोलंदाजीची धुलाई करताना पिसे काढली. मॅक्सवेलने ३८ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह ९० धावा कुटल्या. या जोरावर पंजाबने चेन्नईविरुद्ध ४ बाद २३१ धावांचा डोंगर रचला. हे आव्हान पेलताना धोनीच्या. सुप‍रकिंगला २० षटकात १८७ धावां करता आल्या. या सामन्यात पंजाबने त्यांच्यावर ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बाराबती स्टेडियममधील या लढतीत चांगली सुरुवात करताना पंजाबच्या वीरेंदर सेहवागने २३ चेंडूंत ३० धावा केल्या. मात्र, सलामीला आलेल्या मनदीपसिंगला फारकाळ टिकाव धरु शकला नाही. त्याधनंतर मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर ही जोडी जमली. यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. यांच्या फटकेबाजीचा सर्वाधिक फटका ईश्वर पांडे, अश्विन, रवींद्र जाडेजा, ड्वेन स्मिथ या गोलंदाजांना बसला. या जोडीने ६४ चेंडूंत १३५ धावांची भागीदारी रचली. मिलर ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर माघारी परतला.

यानंतर शतकाजवळ येऊन मॅक्सवेल पुन्हा एकदा बाद झाला. यानंतर जॉर्ज बेलीने हिल्फेनहॉसच्या षटकात चार चौकार ठोकून १७ धावा, तर त्याच्या पुढच्या षटकात जॉन्सन-बेली जोडीने २३ धावा वसूल केल्या. बेली आणि मिचेल जॉन्सनने पाचव्या विकेटसाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी रचून किंग्ज इलेव्हन पंजाबला २३१ धावांपर्यंत पोहचवले. यंदाच्या मोसमातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

चेन्नईनं अडखळत्या सुरुवातीनंतरही २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. ब्रँडन मॅकलम, सुरेश रैना, फाफ ड्युप्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनीनं जोरदार फटकेबाजी केली, पण त्यांना १८७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Leave a Comment