गणितातसुध्दा घोळ

modi
मोदी नावाचा ‘राक्षस’ सत्तेत आल्यास आपले काय होईल या भीतीने कॉंग्रेसच्या नेत्यांना ग्रासले आहे. पण वरकरणी तसे न दाखवता त्यांनी दुःषप्रचार सुरू केला आहे. मोदी सत्तेत आल्यास खरे त्यांचे नुकसान होणार आहे, त्यांची कमाई बुडणार आहे, केलेली पापे फेडावी लागणार आहेे. पण तसे उघड सांगता येत नाही. म्हणून त्यांनी वरकरणी मोदी सत्तेवर आल्यास देशाचे नुकसान होईल असे सांगायला सुरूवात केले आहे. आपल्यावर कोसळणारे हे संभाव्य गंडांतर टळावे यासाठी त्यांनी राजकारणाची नवी मांडणी डोळ्यासमोर ठेवली आहे. तिच्यात मोदी रोखो हा दृष्टिकोन समोर ठेवून तिसर्‍या आघाडीशी हातमिळवणी करण्याचा विचार सुरू केला आहे. तिसर्‍या आघाडीतले संभाव्य पक्ष आपल्या जवळ येतील की नाही याबद्दल त्यांना साशंकतासुध्दा वाटते आणि तसे होऊ नये म्हणून आता या गडबडीतसुध्दा सीबीआयचा वापर सुरू केला आहे. तामिळनाडूत मतदान झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी टूजी स्पेक्ट्रम प्रकरणात करूणानिधींच्या कुटुंबाला अडचणीत आणणारी कारवाई केली आहे. एक प्रकारे राजकीय मांडणीसाठीच हे केलेले आहे. त्यांच्या अशा धाक दडपशामुळेच मायावती आणि मुलायमसिंग कॉंग्रेसवर मायावंत आणि मुलायम झाले आहेत.

एकंदरीत कॉंग्रेस पक्षाला नव्या मांडणीचे वेध लागले आहेत. या संभाव्य समीकरणाच्या बाबतीतसुध्दा कॉंग्रेस पक्षात नेहमीपप्रमाणेच मतभेद आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिसरी आघाडी आणि कॉंग्रेस यांचे संमिश्र सरकार असावे असा विचार मांडला आहे. मात्र सलमान खुर्शिद यांनी त्याला विरोध करीत कॉंग्रेसने तिसर्‍या आघाडीला बाहेरून पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. या सगळ्या मतभेदांमध्ये गप्प बसतील तर दिग्विजय कसले. त्यांनीसुध्दा आपली कल्पना बोलून दाखवली आहे. मोठा राजकारण धुरंधर नेता असल्याचा आव आणून बाहेरून दिलेला पाठिंबा उपयुक्त नसतो असे म्हटले आहे. केंद्रातल्या अस्थिर, संमिश्र सरकारांना कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याची १९७९ सालपासूनची परंपरा आहे. या परंपरेनुसार इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी या तिघांनीही तिसर्‍या आघाडीच्या सरकारांना पाठिंबा देऊन त्यांची फसगत केलेली आहे. १९७९ साली इंदिरा गांधी यांनी चरणसिंग यांना पाठिंबा दिला आणि काढला. नंतर राजीव गांधी यांनी १९९० साली चंद्रशेखर यांच्या अल्पमतातल्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला पण तोही चार महिन्यात काढला. नंतर १९९६ साली सोनिया गांधी यांनी तिसर्‍या आघाडी सरकारचा असाच खेळखंडोबा केला.

आता दिग्विजय सिंग असा पाठिंबा निरर्थक असतो असे म्हणतात पण त्यांना नेमके काय म्हणायचे आणि त्यांना हे पाठिंब्याचे प्रयोग निरर्थक का वाटतात यावर विचार केला पाहिजे. कॉंग्रेसने आजवर कधीच सकारात्मक हेतूने कोणाला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. कॉंग्रेसची भूमिका नेहमीच नकारात्मक राहिलेली आहे. देशामध्ये आघाड्यांचे युग आलेले आहे, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आघाडीचा प्रयोग अधिक सक्षमपणे राबवून लोकांचा आघाडी सरकारच्या प्रयोगावरचा किंवा एकंदरीतच लोकशाहीवरचा विश्‍वास वाढावा तसेच आघाड्याचे युग आल्यामुळे अस्थिरता आली आहे असे वाटू नये म्हणून कॉंग्रेसने कधी कोणाला पाठिंबा दिलेला नाही. आपल्याशिवाय कोणालाही केंद्रात स्थिर सरकार देता येत नाही हे मत प्रस्थापित करणे आणि विरोधी पक्ष म्हणजे खिचडी अशी भावना निर्माण करणे हाच कॉंग्रेस पक्षाचा बाहेरच्या पाठिंब्यामागचा सवंग हेतू राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी चरणसिंग, देवेगौडा, चंद्रशेखर आणि गुजराल यांना पाठिंबाही दिला आणि काही दिवसात तो काढूनसुध्दा घेतला. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या प्रयोगाकडे गांभिर्याने पहात नाही असे दिसून आले.

कॉंग्रेसला बाहेरच्या पाठिंब्याचे वावडेच आहे तर त्याने या पंतप्रधांनाना तात्पुरता तरी पाठिंबा का दिला असा प्रश्‍न निर्माण होतो. पण त्यामागे कॉंग्रेसचा हेतू जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ नये असा नकारार्थी राहिलेला आहे. नकारार्थी राजकारणातून फार काही निष्पन्न होत नसते आणि त्यामुळे कॉंग्रेसच्या बाहेरच्या पाठिंब्यातून तसे काही निष्पन्न झालेच नाही. मात्र दिग्विजय सिंग यांना बाहेरचा पाठिंबा निरर्थक वाटतो तो दुसर्‍या एका दृष्टिकोनातून होय. एकदा आपण बाहेरचा पाठिंबा दिला सरकारमधली आपली भूमिका दुय्यम होते आणि सत्तेचे लाभ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाहीत. हे पाठिंब्याला निरर्थक म्हणण्यामागचे कारण आहे. कॉंग्रेसला आपण देशावर राज्य करण्यासाठीच आहोत असे वाटत असते. आपल्याशिवाय कोणी राज्य करू शकत नाही आणि तरी दुसर्‍या कोणाला तशी संधी मिळालीच तर ती काहीतरी चूक आहे असे म्हणण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच कधी नाईलाजाने प्रादेशिक पक्षांना जवळ करावे लागलेच तर कॉंग्रेस पक्ष त्या पक्षांना कधीही सन्मानाने वागवत नाही. देशातला प्रमुख पक्ष आपणच आहोत हा त्यांचा भ्रम आहे. त्या अहंगंडातून त्यांना बाहेर पडता येत नाही म्हणून बाहेरचा पाठिंबाही त्यांच्यासाठी संकट असते.

Leave a Comment