कुशी बदलताना…….

dalit
जग कुशी बदवत आहे. ग्रामीण भागातले वास्तव बदलत आहे. अर्थव्यवहार बदलत आहेत. पण जुन्या व्यवस्थेत हितसंबंध असणारांना हा बदल रुचत नाही. पचत नाही. गळी उतरत नाही. जुन्या काळात ग्रामीण भागातली अनेक कामे बार बलुतेदारांना वाटलेली होती. प्रत्येकजण आपल्या जातीच्या वाट्याला आलेले काम नेकीने करीत होता पण जन्मभर त्यातच कुजत होता. त्यांची उपजीविका जमीनदार आणि शेतकर्‍यांनी दिलेल्या बलुत्यावर भागत होती. व्यवस्थेत आपण कुजत चाललोय म्हणून बंड करावे तर बलुते बुडण्याची भीती होती. म्हणून कोणी बंड करीत नव्हते. आता बलुते मागणारांची मुले टमटमवर ड्रायव्हर म्हणून काम करायला लागली, मोबाईल चार्जिंगच्या दुकानात काम करायला लागली, शेजारच्या शहरात शेतीशी संबंधित नसलेल्या व्यवसायात काम करायला लागली. त्यामुळे जुनी व्यवस्था जतन करणार्‍या शेतकरी आणि जमीनदारांना ती जुमानेनाशी झाली. जातीच्या वाट्याला आलेली कामे ती नाकारायला लागली. बड्या लोकांच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याचे आणि लग्नाच्या मेजवानीची भांडी घासण्याचे काम न्हावी समाजाला नेमून दिलेले असते. पण जळगाव जिल्हयात एका गावात न्हावी समाजाच्या तरुणांनी ही कामे नाकारली. कारण ती मुले शिकली होती आणि त्यांनी गावातच केश कर्तनालय टाकलें होते.

जुन्या काळात त्यांच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने व्यवसाय केला होता तसा तो त्यांनी केलेला नाही. त्यामुळे ते ही कामे नाकारू लागले. त्यामुळे गावातल्या काही मातबर लोकांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर बहिष्कार टाकला. समाजातला मोठा वर्ग आता शेतीबाह्या कामातून बाहेर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या कामांवर परिणाम होत आहे. सवर्ण लोेकांना राबायला माणसे मिळेनाशी झाली आहेत. तामिळनाडूत या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा असे आढळले की, ग्रामीण भागातला दलित आणि मागासवर्ग शेतीवर अवलंबून असण्याचे प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण भागातली श्रमविभागणी, पंरपरेच्या नावावर होणारी या कामांची सक्ती आणि त्यावर असलेले त्यांचे अवलंबन या गोष्टी बदलत आहेत. आपण गावातल्या जमीनदाराने टाकलेल्या तुकड्यावर अवलंबूनच नाही तर मग त्याला लवून नमस्कार करायचा कशाला असा विचार हा श्रमिक करायला लागला आहे. जमीनदारांना ही गोष्ट रुचेना, पचेना आणि मानवेना. त्यातून संघर्ष निर्माण होत आहे. आता तर हाच वर्ग राजकारणात आणि शिक्षणातही पुढे येत आहे. पण समाजाचा विशेषतः ग्रामीण भागातला मोठा वर्ग जातीयवादी प्रवृत्तीचा आणि उच्च नीच भाव बाळगणारा आहे.

दलित समाज पुढे येत असल्याने सरंजामशाही प्रवृत्तीच्या या लोकांना त्यांचा हा विकाससहन होत नाही. एखाद्या गावामध्ये अनेक वर्षे आपापतःच नेतृत्व प्राप्त झालेल्या वर्गाला आता चावडीवर सरपंच म्हणून एखादी दलित महिला बसल्याचे बघावे लागत आहे, सहन करावे लागत आहे. जातीगत उच्च नीच भाव अजूनही मनात असलेल्या या लोकांना हे दृश्य स्वीकारणे मोठे अवघड जात आहे. मात्र त्यांना स्वतंत्र देशामध्ये या मनोवृत्तीचा त्याग करावा लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे एका प्रेम प्रकरणातून दलित तरुणाची हत्या झाली. या दलित विद्यार्थ्याचे एका सवर्ण मुलीवर होते म्हणतात. काही लोकांचे म्हणणे वेगळे आहे. हा मुलगा त्या मुलीची छेड काढत होता आणि त्याला तसे न करण्याबद्दल बजावलेही होते. मात्र तो ऐकेना त्यामुळे चिडून या लोकांनी त्याची हत्या केली. या दोन्हीपैकी कोणतीही बाजू खरी मानली तरी छेडाछेडीच्या एका प्रकरणाला असे दलित विरुध्द सवर्ण असे स्वरूप आले आहे. त्यात सवर्ण समाजाची मानसिकता व्यक्त झाली आहे. दलित तरुण आपल्या मुलीची छेड काढत असेल तर त्याला आपणच शिक्षा केली पाहिजे ही ती मानसिकता आहे.

सातारा जिल्ह्यातल्या भिगवण या गावात नेमका याच्या विरुध्द प्रकार घडला आहे. या गावातली काही सवर्ण मुले दलित समाजातल्या मुलींची छेड काढत होती. त्यामुळे त्या मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. मात्र फिर्याद दाखल झाल्याने ते सवर्ण तरुण चिडले आणि त्यांनी तक्रार दाखल करणार्‍या दलित कुटुंबातील लोकांना बेदम मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणार्‍या या लोकांना अटक झाली. पण ते आता जामिनावर सुटले आहेत. मात्र जामिनावर बाहेर येऊनसुध्दा ते या दलित कुटुंबाला पुन्हा धमक्या देत आहेत. म्हणजे याही गावात सवर्णांनी दलितांचा छेडछाडीच्या विरोधात पोलिसांत जाण्याचा अधिकार नाकारला आहे. अशा प्रकारात सारा गाव त्या दलिताच्या विरोधात आणि सवर्णांच्या बाजूने उभा असतो कारण त्या दलित कुटुंबाने दलित असूनही परंपरेने दाखवून दिलेली आपली पायरी सोडलेली आहे. तेव्हा त्यांना शासन होणे यात काही गैर नाही असे त्यांचे म्हणणे असते. अशा दलितांचा न्याय आपणच आपल्या पद्धतीने करणे यात काही गैर नाही, उलट त्यांनी एका दलित तरुणाचा आणि सवर्ण मुलीचा विवाह टाळून जातीची अस्मिताच सांभाळलेली आहे असे जमावाचे म्हणणे असते. आता जमाना बदलला तरीही मनातली उच्च नीच भाव जपणारी सरंजामी प्रवृत्ती बदललेली नाही. ती बदलली पाहिजे.

Leave a Comment