आपचा प्रयोग फसणार का ?

kejriwal_27
आम आदमी पार्टीने राजकीय निरीक्षकांना काही तरी वेगळे करण्याच्या आशा लावल्या होत्या आणि सामान्य माणसांनाही हा पक्ष देशाच्या राजकारणात काही तरी नवीन करणार असे वाटायला लागले होते. अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणात नवीन काही तरी करण्याचा आव आणला होता. पण आज तरी या पक्षाची स्थिती फार आशादायक राहिलेली नाही. या पक्षाचे भवितव्य काय असा प्रश्‍न विचारला जात आहे. कारण या पक्षाविषयी अनेक अपेक्षा बाळगणारे लोक त्याच्या वेड्या वाकड्या चाली पाहून अस्वस्थ झाले आहेत. आम आदमी पार्टीने आता लोकांचे आकर्षण गमावले आहे. अरविंद केजरीवाल यांनी मोठया धाडसाने देशात ४०० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांना ते सोपे गेले कारण गावागावात या पक्षाला एखादा तरी कार्यकर्ता मिळत गेला आणि केजरीवाल यांनी अशा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या अंगावर लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारीची झूल चढवली. त्यातले कित्येक कार्यकर्ते साध्या नगर पालिकेच्या निवडणुकीतही कधी उतरलेले नाहीत. त्यांचा जनतेशी संपर्क नाही.

कितीही प्रामाणिक पणाने निवडणूक लढवायचे ठरवले तरीही शेवटी निवडणुकीची काही रणनीती असतेच. तिचाही मागमूस नाही. पक्ष नवा आहे, संघटनात्मक संरचना झालेली नाही. पण देशभरात ४०० उमेदवार उभे केले आहेत या मागे काय धोरण आहे ? भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसनेही ४०० जागा लढवलेल्या नाहीत. मग आपण कशाच्या जोरावर ४०० जागा लढवणार आहोत याचे कसलेही विश्‍लेषण या पक्षाकडे नाही. या पक्षासाठी कमी उमेदवार उभे करणे आणि त्यांच्याच विजयावर लक्ष केन्द्रित करणे श्रेयस्कर ठरले असते. कारण देशभर प्रवास करतील आणि देशात कोठेही मोठी सभा घेऊ शकतील असे नेतेच या पक्षाकडे नाहीत. अरविंद केजरीवाल हे पक्षाचे सर्वात मोठे नेते. त्यांना आपण काय करीत आहोत याचे कधी भान असत नाही. वाराणसीत मोदींच्या विरोधात कोण असा प्रश्‍न निर्माण होताच लगेच केजरीवाल यांनी घोड्यावर मांड टाकली. आपल्या ऐवजी कोणी तरी स्थानिक उमेदवार उभा करून आपण देशव्यापी प्रचारासाठी मोकळे राहिले पाहिजे हे त्यांना कळले नाही. त्यांनी ४०० उमेदवार उभे केले आहेत पण त्यातल्या ४० मतदारसंघांनाही त्यांनी भेट दिलेली नाही. वाराणसीत मोदींच्या विरोधात उभे राहून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी ४०० उमेदवार उभे केले म्हणून पक्ष राष्ट्रीय होत नसतो. पक्षाला राष्ट्रव्यापी नेतृत्व देण्याची क्षमता असणारे नेते हवेत.

खुद्द केजरीवाल यांची त्यातल्या निदान काही मतदारसंघात पोचण्याची तर व्यवस्थाच नाही तर पक्ष म्हणून असावी लागते की सारी यंत्रणा कोठून असणार ? अरविंद केजरीवाल यांच्यानंतरचे या पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणजे योगेन्द्र यादव. त्यांनी पूर्वी काही वृत्तवाहिन्यांवर निवडणूक निकालांचे विश्‍लेषण केले होते. म्हणून ते लोकांना माहीत आहेत. ते राजकीय कार्यकर्ते किंवा नेते म्हणून कधीच लोकांना माहीत नव्हते पण ते राष्ट्रव्यापी पक्षाचे नंबर दोनचे नेते म्हणवले जात आहेत. आज बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यामध्ये त्यांनी मोठा आव आणून मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत. परंतु या राज्यांच्या आम आदमी पार्टीच्या शाखा आणि मध्यवर्ती संघटना यांच्यात कसलाही समन्वय नाही, चर्चा नाही. देवाण घेवाण नाही. केंद्रातली समिती गोंधळात आहे आणि राज्यातल्या समित्या आपल्या मनाला येईल तशा काम करत सुटल्या आहेत. कसल्या तरी आकर्षणापोटी आम आदमी पार्टीत आलेले कितीतरी कार्यकर्ते आता भ्रमनिरास झाल्यामुळे पक्षाच्या बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत आहेत. एक राष्ट्रव्यापी पक्ष म्हटल्यानंतर त्याच्या शाखा, उपशाखा आणि त्या त्या राज्यातल्या कमिट्या अशी काही संघटनात्मक रचना अभावानेसुध्दा आढळत नाही.

त्यामुळे एकदा १६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले की या पक्षाला प्रचंड गळती लागणार आहे. असे स्पष्ट मत आम आदमी पार्टीच्या बिहार युनिटचे कार्यकारणी सदस्य अजितकुमार सिंग यांनी म्हटले आहे. आपण पक्षात येताना ज्या भावनेने आलो. त्या भावनेचे प्रत्यंतर उमेदवारांच्या निवडीत आलेले नाही. पक्षाने उमेदवारीचे जे निकष जाहीर केले तेच मुळात ढिले होते. मात्र उमेदवार निवडताना त्या संदिग्ध निकषांचा सुध्दा वापर केला गेलेला नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपध्दतीवर प्रचंड नाराज आहेत. एक वर्षाचा पक्ष, कसलीही साधनसामुग्री नाही पण महत्त्वाकांक्षा मात्र प्रचंड ती पूर्ण करण्यासाठी लागणारी साधने नाहीत. मात्र ४०० जागा लढवायच्या असा अविचार करून या पक्षाने आपल्या आयुष्यातल्या पहिल्याच वर्षी स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करून ठेवले आहे. त्यामुळे वर्षभरातच या पक्षाची वाताहत होणार हे उघड दिसत आहे. भारताच्या राजकीय इतिहासात कधी तरी एखादा परिच्छेद भरून माहिती द्यावी लागेल की, आम आदमी पार्टी नावाचा एक प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला पण तो वर्षभरताच फसला.

Leave a Comment