
अक्षयतृतीतेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदी करण्याची भारतात परंपरा आहे. आज सोन्याच्या भावाने १० ग्रॅमला ३० हजारांची पातळी ओलांडली आहे. मात्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार ग्राहकांनी केवळ मुहुर्तापुरतेच सोने खरेदी करणे जादा फायदेशीर ठरणार आहे. आगामी काळात सोन्याचे भाव २७ हजारांवर येतील असा अंदाज जाणकार वर्तवित असल्याने सध्याच सोने खरेदीची घाई करू नये असे सांगितले जात आहे.
अक्षयतृतीयेला मुहूर्ताचेच सोने खरेदी करण्याचा सल्ला
ग्लोब कॅपिटलचे रिसर्च हेड तरूण संतसंगी यांच्या म्हणण्यानुसार नवीन सरकार सत्तेवर येण्यास आता थोडाच कालावधी राहिला आहे. नवीन सरकार पूर्वीच्या सरकारने सोने आयातीवर घातलेले निर्बंध नक्कीच शिथिल करेल व यामुळे सोन्याचे दर घसरतील. आयात वाढली की पुरवठाही वाढणार आहे. त्यातच अमेरिकी अर्थव्यवस्था रिकव्हरीच्या मोडमध्ये गेली असल्याने सोन्याची मागणी कमी होणार आहे.
मात्र सोन्याचे दर यापेक्षाही वाढण्याची एक शक्यता आहेच. रूपयाचे मूल्य घसरले किंवा त्रिशंकू सरकार सत्तेत आले तर त्याचा परिणाम सोने दरावर होऊ शकतो. रूपया घरसला तर आयात मूल्य वाढणार आहे तसेच त्रिशंकू सरकार आले तर शेअर बाजारावर त्याचा परिणाम होऊन शेअरमधील गुंतवणूक कमी होईल व गुंतवणूकदार हा पैसा सोने खरेदीत लावतील असेही सांगितले जात आहे.
