इस्लामाबाद- जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तान, कॅमेरून व सिरीया या देशांवर आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध लागू केले असून हा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. भारताने महिन्यापूर्वीच या देशांवर प्रवास निर्बंध घातले आहेत असेही समजते.
या देशांत चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिलेल्या सर्वांसाठी पोलिओ लस आणि पोलिओचे इंजेक्शन घेणे बंधनकारक करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांनीही येथे चार आठवड्यापेक्षा अधिक मुक्काम केला असेल तर त्यांनीही ही लस घ्यावयाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २१ सदस्यीय समितीने ही शिफारस केली आहे.
पाकमधील जागतिक आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय अभियान समन्वयक जुबैर मुक्ती म्हणाले की पोलिओच्या विषाणू फैलावू नये म्हणून हे निर्बंध घातले गेले आहेत. मात्र या देशातील सध्याची स्थिती सुधारली की हे निर्बंध हटविले जाणार आहेत.