मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष

mh

आपल्या आरोग्याच्या विविध समस्यांची उदंड चर्चा सातत्याने होत असते. परंतु मानसिक आरोग्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत असते. विसंगती अशी आहे की, अतीशय तणावपूर्ण असे जीवन जगत असतानाच आणि जीवनातले तणाव वाढत असतानाच आपण मात्र त्यातून निर्माण होणार्‍या मानसिक विकृतींकडे तेवढ्याच अधिक प्रमाणात दुर्लक्ष करायला लागलो आहोत. मानसिक रोगांविषयी अज्ञान, त्यासंबंधात असलेले गैरसमज आणि डॉक्टरांचा अभाव या तीन गोष्टींमुळे येत्या काही वर्षात भारतात मानसिक रुग्णांची संख्या प्रचंड वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून हळू हळू वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी लोकांच्या मानसिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याविषयी जागृती करण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याच्या बाबतीत एक इशारा दिलेला आहे.

येत्या दहा वर्षांमध्ये सततच्या तणावामुळे निर्माण होणारे नैराश्य किंवा डिप्रेशन हा जगातला नंबर दोनचा विकार होणार आहे. त्यावर इलाज करण्याची सोय नसताना पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसताना हा रोग मात्र वाढत जाणार आहे. सध्याच जगामध्ये दर पाच महिलांमागे एक महिला आणि दर बारा पुरुषांमागे एक पुरुष डिप्रेशनच्या विकाराने त्रस्त आहे. या विकाराचे शरीरावर होणारे परिणाम लोकांना जाणवतात. अतीशय थकवा येणे, डोळ्याखालील काळी वर्तुळे, डोके दुखणे, मळमळणे, भूक न लागणे, झोप न लागणे, चिडचीड होणे इत्यादी परिणाम होत असतात आणि ते शरीरावर होत असल्यामुळे लोक या सगळ्या शारीरिक लक्षणांवरच औषधोपचार करत राहतात. म्हणजे डोके दुखत असेल तर डोकेदुखीचे औषध घेत राहतात. डोकेदुखीच्या मूळ मानसिक कारणाकडे ते जात नाहीत. त्यामुळे रोगाचे मूळ कारण तसेच राहते आणि लक्षणांवर घेतलेल्या औषधातून नवनव्या शारीरिक व्याधी मात्र वाढत जातात.

सतत औषधे घेऊनही शारीरिक व्याधी कमी होत नाहीत. तेव्हा एखादा डॉक्टर अशा पेशंटला मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतो. तेव्हा त्या पेशंटला धक्का बसतो. कारण मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची वेळ येणे म्हणजे वेड लागणे, अशी त्याची कल्पना असते. आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलो तर लोक आपल्याला वेडा समजतील, या समजुतीने तो त्या तज्ज्ञाकडे ङ्गिरकत सुद्धा नाही. खरे म्हणजे हे काही वेड नसते. सततची दगदग, कामाचा तणाव आणि नोकरी जाण्याविषयी वाटणारी सततची भीती याचा एक मानसिक दबाव असतो. काही वेळा स्पर्धेची तीव्र भावना असते. त्यातून मनाच्या रचनेत काही बदल होत असतात ते काही वेड नसते आणि एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे एक-दोनदा गेलो की यातून चार मार्ग सुद्धा निघत असतो. मात्र अज्ञानापोटी या सार्‍या गोष्टी टाळल्या जातात. परिणामी मानसिक आजारही बळावतो आणि शारीरिक आजार तर बळावतातच.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment